लसीकरण मोहिमेसाठी ग्रामपंचायत निवडणूक पॅटर्न राबवावा

Share This News

नागपूर
नागपूर जिल्ह्यात ज्या गतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या गतीने लसीकरण होताना दिसून येत नाही. यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून लसीकरणाबाबत पसरविण्यात येत असलेल्या अफवांमुळे ग्रामीण भागात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण विकासाची धुरा सांभाळणारे सरपंच व सदस्य यांच्या माध्यमातून ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी वापरल्या जाणार्‍या पद्धतीचा अवलंब जर लसीकरणासाठी केल्यास, निश्‍चितच ही लसीकरण मोहीम यशस्वी होऊ शकते, असे मत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती शरद डोणेकर यांनी व्यक्त केले असून, तशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.
डोणेकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून कोरोना साथरोगाने थैमान घातलेला आहे. आता दुसरी लाट अधिक तीव्र स्वरूपात आलेली आहे. अशाही परिस्थितीत भारतात निर्माण झालेल्या कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. वय वर्षे ४५ च्या वर असणार्‍या सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. अधिकारी, पदाधिकारी, सेलिब्रिटी स्वत: लस घेऊन लसीकरण करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करीत आहे. परंतु, दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अकारण अफवा पसरवण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीबाबत संशय निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस मतदारांना ज्या पद्धतीने ग्राम पंचायत स्तरावरील पदाधिकारी मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून मतदानासाठी प्रवृत्त करतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा जास्त मतदान होते. ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ग्राम विकासाचे अग्रदूत असणारे ग्राम पंचायत सरपंच व सदस्य यांच्या माध्यमातून ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस मतदान करण्यासाठी जी पद्धत हे पदाधिकारी वापरतात त्या पद्धतीचा अवलंब केल्यास लसीकरण मोहीम यशस्वी होऊ शकते. ग्रामीण भागात यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे हे लसीकरण मोहिमेचे दूत बनू शकतात, असेही डोणेकर यांचे म्हणने आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.