FIR दाखल झाल्यानंतर ग्रेटा थनबर्गचं दिल्ली पोलिसांना उत्तर!
शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग(greta thunberg) हिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला होता. त्यामुळे ग्रेटा अडचणीत आली आहे की काय? असं वाटत असतानाच ग्रेटा थनबर्गनं दिल्ली पोलिसांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्वीट (Twitter) करूनच ग्रेटानं गुन्हा दाखल करण्याच्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी अजूनही शेतकऱ्यांना पाठिंबा देत असून त्यांच्या सोबत उभी आहे’, असं ट्वीट ग्रेटानं केलं आहे. या प्रकारावरून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉप गायिका आणि मॉडेल रिहानाने ट्वीट केल्यानंतर भारतीय कलाकार, क्रीडापटू आणि सेलिब्रिटींनी ‘हा भारतीय सार्वभौमत्वावर घाला आहे’, अशी भूमिका मांडली होती. त्यांनी विरोध केलेल्या व्यक्तींमध्ये ग्रेटा थनबर्ग देखील होती.
नेमकं काय म्हणाली ग्रेटा?
एफआयआर दाखल झाल्यानंतर आपल्या ट्वीटमध्ये ग्रेटा म्हणते, ‘मी अजूनही शेतकऱ्यांसोबतच आहे आणि त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा देते. द्वेष, धमक्या किंवा मानवी अधिकारांचं हनन मला यापासून परावृत्त करू शकत नाही.’