चिमुकल्याला मिळाला पुनर्जन्म….He has been reborn due to timely surgery due to the efficiency of the health department.
वैद्यकीय सेवा ठरली देवदूत
अमरावती : प्ल्युरल इन्फ्युजनचे निदान झालेल्या मेळघाटातील सहा महिन्याच्या राकेश कासदेकर या चिमुकल्यावर आरोग्य विभागाच्या कार्यतत्परतेमुळे वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्याला पुनर्जन्म मिळाला आहे. वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया त्याचे कुटुंबिय व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रु येथील अवघ्या सहा महिन्याच्या राकेश रामा कास्देकर यास 14 जानेवारी रोजी अचानक श्वास घेण्यास त्रास , श्वासास अडथळा होऊ लागला. वैद्यकीय उपचारांसाठी राकेशचे कुटुंबिय तयार नव्हते. ही माहिती कळताच गावातील आरोग्य सेविका स्मिता राऊत, आशा सेविका सुनिता कासदेकर यांनी कुटुंबियांचे समुपदेशन करून बाळाची डॉ. सागर कोगदे यांच्याद्वारे वैद्यकीय तपासणी करुन घेतली. तपासणीअंती बाळाची आरोग्य स्थिती चांगली नसल्याचे आढळल्याने तत्काळ रुग्णवाहिका बोलावून चुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी राकेशच्या आईवडलांना धीर व विश्वास दिला. चुर्णी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. दारसवार यांच्या सल्ल्यानुसार बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यासाठी सर्व संदर्भ सेवा कुटुंबाला उपलब्ध करुन देण्यात आल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाल्यावर बालरोगतज्ज्ञामार्फत बाळावर तत्काळ वैद्यकीय उपचार व तपासणी सुरु करण्यात आली. बाळाच्या छातीत प्ल्युरल इन्फ्युजन झाले असल्याचे निदान झाले. बाळाला सगळ्या प्रकारची प्रतिजैविके देऊनही त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसून येत नव्हत्या. प्रकृती जास्त गंभीर व अत्यवस्थ होत असल्याचे दिसून येत असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिश हुमणे यांना पाचारण करण्यात येऊन त्यांच्या मार्गदर्शनात शस्त्रक्रिया करुन उपचार करण्याचे ठरविण्यात आले.
बाळाच्या प्ल्युरल स्पेसमध्ये विशेष प्लास्टिक ट्यूब टाकून पस बाहेर काढणे म्हणजेच आय.सी. डी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. संतोष राऊत यांनी यशस्वीरित्या केली. बालरोग तज्ज्ञ डॉ. नागलकर यांच्या औषधोपचाराखाली राकेशला पुनर्जन्म मिळाला. त्याची प्रकृती आता चांगली असून नैसर्गिकरित्या श्वासोच्छवास होत आहे. राकेशच्या आईवडलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सांघिक समन्वयातून यशस्वी केल्याबद्दल डॉ. निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, सामान्य रुग्णालयातील संपूर्ण डॉक्टर, परिचारिका चमू, ग्रामीण रुग्णालय चुर्णी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी- कर्मचाऱ्यांचे, आरोग्य सेविका, आशा वर्कर आदींचे अभिनंदन होत आहे.
आरोग्य यंत्रणेने अशीच कार्यतत्पर राहून कामे करावीत. आरोग्य विभागावर मेळघाटातील रहिवाश्यांचा विश्वास निर्माण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कार्यक्षेत्रात भेटी देऊन त्यांचे समुपदेशन करावे. या माध्यमातून मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे