दिव्यांग पदवीधर मतदारांसाठी हेल्पलाईन – जिल्हाधिकारी
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील दिव्यांग मतदारांना मतदार यादीतील आपले नाव तसेच मतदान केंद्र सुलभपणे उपलब्ध व्हावे, यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. दिव्यांग पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहणार नाहीत. यासाठी विशेष समन्वय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदानासंदर्भात मार्गदर्शन तसेच मतदार यादीतील नाव सुलभपणे उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत दूरध्वनी क्रमांक 0७१२-२५४१८३२ या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. तसेच दिव्यांग मतदारांसाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल ऑफिसर अभिजित राऊत हे 0७१२-२७00९00 व २७२६२८0 या दूरवध्वनीवरसुद्धा पदवीधर मतदार संघासाठीच्या मतदान प्रक्रियेबद्दल दिव्यांगांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली. पदवीधर मतदार संघासाठी दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत. दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. |