राज्याच्या पोलिसमहा संचालक पदी हेमंत नगराळे
मुंबई – महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल याबाबतच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत या नियुक्तीचा कार्यकाळ असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्रे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्या हाती सोपवन्यात आली आहेत. सेवा ज्येष्ठत्वानुसार संजय पांडे हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत तर सुरेंद्र पांडेय हे १९८६ बॅचचे आहेत. तसेच नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पण राज्याच्या पोलीस महासंचालक पदाच्या स्पर्धेत नागराळे बाजी मारतील अशी चर्चा सुरु होती.
हेमंत नगराळे हे मूळचे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे आहेत. नगराळे यांच प्राथमिक शिक्षण तेथील जिल्हा परिषद शलेत झाले. त्यानंतर नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले. वीएनआयटी मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांचे वडील नामदेव नगराळे हे सिंचन विभागाचे निवृत्त अभियंता आहे तर मोठे भू दिलीप हे महापालिकेचे निवृत्त अभियंता आहेत. हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये प्रभात रंजन यांच्याकडून नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. आपल्या कारकीर्दीत नगराळे यांनी आयुक्तालयाचा कारभार उत्तम केला होता. मात्र, काही प्रकरणांमुळे त्यांचे नाव चर्चेतही होते. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची जूलै २०१८ साली बदली झाली असून त्यांच्या जागेवर संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. आता ते राज्याच्या लीगल आणि टेक्निकल विभागाचे पोलीस महासंचालक पदी कार्यरत आहेत.