गृहमंत्र्यांचा पतंजलीला धक्का, कोरोनील विक्रीला बंदी | Home Minister pushes Patanjali, coronal sale banned
मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेल्या व कोरोनावर प्रभावी असल्याची जाहिरात केल्या गेलेल्या ‘कोरोनील’ औषधाच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी देता येणार नाही, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे. ट्वीटच्या माध्यमातून देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे इतक्या घाईने हे औषध महाराष्ट्रातील बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी त्याला समर्थन देणे योग्य नाही, असे देशमुख यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयएमए व इतर संबंधित मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोरोनील या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
आयएमएचे म्हणणे
काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कोरोनील हे औषध बाजारात आणण्यात आले होते. सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता ते कोरोनावर मात करणारे औषध म्हणून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या औषधाला कुठल्याही अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळालेली नाही. ती मिळाली असल्यास पतंजलीने तसे सिद्ध करावे, अशी मागणी आयएमएने केली आहे.