रुग्णालयांनी किमान दोन दिवस पुरेल इतका वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा करावा – पालकमंत्री छगन भुजबळ

Share This News

नाशिक :- वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यात सुयोग्य नियोजनातून हळूहळू होतेय सुधारणा होत असून जोपर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत डॉक्टरांनी ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक करावा. किमान दोन दिवस पुरेल इतक्या ऑक्सिजनचा साठा आपल्या रुग्णालयात ठेवण्यात यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी कृषिमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, वासंती माळी,कोरोना सांख्यिकीचे घटना व्यवस्थापक डॉ.अनंत पवार, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्हा नियोजनातून मंजूर करण्यात आलेले ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. ऑक्सिजनच्या कामकाजासाठी नियमित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच आवश्यक त्या ठिकाणी ड्युरा सिलेंडरची व्यवस्था करण्यात यावी. मोठ्या रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था निर्माण करण्यात यावी.

औषधांचा साठा मुबलक प्रमाणात आहे की नाही याची नियमित तपासणी करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांनी आपल्याला आवश्यक असलेल्या औषध, ऑक्सिजन याबाबत नियमित अहवाल देऊन आपली मागणी कळवावी, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. लॉकडाऊनचा परिणाम चांगला झाला असून आपण त्यामाध्यमातून सुमारे दोन हजारांनी रूग्ण संख्या कमी करू शकलो आहोत. जिल्हाभरात यापुढील काळातही लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक असल्यास स्थानिक बाजारपेठा बंद ठेवण्यात याव्यात. भाजीपाला खरेदी विक्री हो शक्यतो मोकळ्या जागेत, मैदानावर करण्यात यावे. लॉकडाऊनच्या माध्यमातून कडक निर्बंध लावण्यात येऊन त्याचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.लॉकडाऊन यशस्वी करण्यात पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून पोलिसांनी काटेकोर नियोजन करावे.

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचे कडक पालन करण्यात यावे. लसीकरणाबाबत जिल्हाभरात नियोजन करण्यात यावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या अंत्यविधीची व्यवस्था शासकीय खर्चातून करण्याची आवश्यकता- दादाजी भुसे कोरोनाबाधित रूग्ण व त्याबरोबर असणारे नातेवाईक हे सुपरस्प्रेडर ठरत असून आहे. त्याचबरोबर कोरोना बाधित मृत रूग्णांच्या अंत्यविधीची व्यवस्था शासकीय पातळीवरून करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. रूग्ण मृत पावला तर त्याचे नातेवाईक त्याचा नियमाप्रमाणे अत्यविधी न करता त्यास गावी घेवून जातात व मोठ्या गर्दीत त्याचा अंत्यविधी पार पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अंत्य विधींमधूनही कोरोनाचा प्रसार होतो आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या अंत्यविधीची व्यवस्था शासकीय पातळीवर करता येण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण व आदिवासी भागात ऑक्सिजन बेड सह आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करावे- नरहरी झिरवाळ पूर्वीची लाट ही शहरी भागापूरती मर्यादित होती. त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणा शहरी भागासाठी उपयोगात आणता आली, परंतु या लाटेत शहरी भाषांसह ग्रामीण भागालाही कोरोनाने वेढले आहे. ग्रामीण भागात ऑक्सिजनसह आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याची गरज असल्याचे यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सहभाग घेतला. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.