तन्मय फडणवीसला लस दिलीच कशी गेली?; काँग्रेसची प्रश्नांची सरबत्ती

Share This News

मुंबई: रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून महाविकास आघाडी व भाजपमध्ये राजकीय वाद सुरू असतानाच, आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजप नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याला दिली गेलेली कोविड लस यासाठी कारण ठरलं आहे. ‘कुठल्याही नियमात बसत नसताना तन्मय फडणवीस याला लस कशी काय दिली गेली?,’ असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण सुरू असून सध्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस दिली जात आहे. अनेक जण लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तन्मय फडणवीस याचाही फोटो असा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसनं तन्मय फडणवीसचा लसीकरणाचा फोटो शेअर करून देवेंद्र फडणवीस व भाजपला घेरलं आहे.
‘४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का,’ असा सवाल काँग्रेसनं ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे. काँग्रेसनं या निमित्तानं काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, तो फ्रंटलाइन वर्कर आहे का?, तो आरोग्य कर्मचारी आहे का? आणि जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी गेली?,’ अशी सरबत्तीच काँग्रेसनं केली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणे भाजपकडं लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?,’ असा खोचक टोलाही काँग्रेसनं हाणला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.