अकोल्यात शंभरावर ऑटो जप्त, पोलिसांची धडक मोहिमHundreds of autos seized in Akola, police crackdown
अकोला : कोरोनाचा सामूहिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागून करण्यात आली आहे. अशात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या व कोरोनाची जोखीम वाढविणारे शंभरावर ऑटो अकोला पोलिसांनी जप्त केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अकोल्यात महसूल, मनपा आणि पोलिस प्रशासन आता रस्त्यावर उतरले आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक अंतर कायम ठेवण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वाहन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. ऑटोमध्ये चालक व दोन प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. मॅक्सिमो, कालिपिलीत चालकांशिवाय फक्त तीन प्रवासी बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले आहेत. पोलिस अधीक्षकांनर आदेश देताच शहर वाहतूक पोलिस विभाग कामाला लागले. निरीक्षक गजानन शेळके यांच्यासह विविध पथकांनी केलेल्या कारवाईमुळे जप्त करण्यात आलेल्या वाहनांनी शहर वाहतूक कार्यालयाचा परिसर भरला आहे. आता येथे पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. जप्त करण्यात आलेली वाहने आता चालकांना कोर्टातून सोडवून घ्यावी लागणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस उपअधीक्षक सचिन कदम हे देखील कारवाईसाठी उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत.