मी पुन्हा येईन; ट्रम्प यांचे निवडणूक लढवण्याचे संकेत |I will come again; Signs of Trump contesting the election

Share This News

वॉशिंग्टन:  राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही सत्तेवर कायम राहण्याची धडपड करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यपदाचा कार्यभार सोडल्यानंतर दिलेल्या पहिल्याच सार्वजनिक भाषणात २०२४च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात तिसऱ्यांदा उतरण्याचे संकेत दिले. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना एकजूट होण्याचे आवाहनही केले. तसेच त्यांनी बायडेन प्रशासनावर तीव्र टीका केली. देश एक महिन्यातच ‘प्रथम अमेरिकेपासून’ ‘शेवट अमेरिके’पर्यंत पोहोचला आहे, असा आरोप त्यांनी केला. फ्लोरिडामधील ऑरलँडोमध्ये ‘कन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कमिटी’च्या वार्षिक सत्रात ते बोलत होते. त्यांनी २०२४मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे राहणार असल्याची घोषणा केली नसली तरी ते त्या दिशेने पावले टाकत असल्याचे पुरेसे संकेत दिले. ‘आपण पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये येऊ. आपण सिनेटमध्ये विजय मिळवू आणि नंतर रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष व्हाइट हाऊसवर सत्ता स्थापन करेल. ते कोण असतील, हे मला माहीत नाही, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी यावेळी नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता फेटाळली. नवा पक्ष स्थापन केल्यास मतांची विभागणी होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच त्यांनी २०२२च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन समर्थकांना केले. ट्रम्प यांचे टीकाकार सिनेटर मिट रॉमनी यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांनी २०२४मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांत ट्रम्प यांनी विजय मिळवला, तर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.

मागील वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव स्वीकारावा लागला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला निवडणूक निकाल मान्य करण्यास नकार देत आपणच विजयी झालो असल्याचा सातत्याने दावा केला. त्यांनी कोर्टातही धाव घेतली होती. मात्र, पुरावे देण्यास त्यांना अपयश आले. तर, जानेवारी महिन्यात ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेत घुसून हिंसाचार केला. त्यावेळी इलेक्टोरल मतांची घोषणा करण्यात येत होती. ट्रम्प यांनी चिथावणी दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप डेमोक्रॅटीक पक्षाने केला होता. ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग आणण्यात आला. मात्र, त्यांची त्यातून सुटका झाली.

ट्रम्प


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.