जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे गजाआड

Share This News

सावनेर : केळवद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना शुक्रवार, २३ एप्रिल रोजी गुप्त माहिती मिळाली की, पांढुर्णा ते नागपूर जाणार्‍या महामार्गाने महेन्द्रा बोलेरो पिकअप क्र. सी. जी. 0७ /बी. बी. १३0७ या वाहनामध्ये अवैधरित्या कत्तलीसाठी गौवंशाची वाहतूक केली जात आहे. यानुसार नाकाबंदी करून लाखोंच्या मुद्देमालासह जनावर तस्करांना अटक करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, ठाणेदार ठाकूर यांनी खात्रीशिर माहितीच्या आधारावर पांढुर्णा मार्गावरील महामार्ग क्र.४७ वरील आरटीओ चेक पोस्ट खुर्सापार येथे नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी केली असता सकाळी ८.३0 वाजतादरम्यान महेन्द्रा बोलेरो पिकअप येताना दिसले. सदर वाहन नाकाबंदीचे ठिकाणी न थांबविता खुर्सापार गावाच्या दिशेने सुसाट पळवून महामार्गावरी जाणार्‍या येणार्‍या वाहनांना व लोकांना धोका निर्माण होईल इतक्या वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवू लागला. खुर्सापार गावाच्या आधी त्याच्या वाहनासमोर गड्डा आल्याने चालकाचे संतुलन बिघडल्याने त्याने आपल्या ताब्यातील वाहन मार्गाच्या कडेला असलेल्या झाडाला धडकविले. त्यामुळे सदर वाहनाच्या समोरील ग्लास फुटला व वाहनचालक तसेच त्याचा साथीदार बाजुच्या शेतशिवारात पळू लागले. त्यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. सदर आरोपींमध्ये वाहनचालक मोहम्मद सद्दाम मोहम्मद अब्दुला (वय २४, रा. कब्रस्थान रोड, भानखेडा डोबीनगर छोटी लाईन सिगंलच्या जवळ, मोमीनपूरा, नागपूर), वाहनचालक मोहम्मद कमळे आलम अंजार शेख (वय २0, पिली नदी, वनदेवी चौक, परवेशनगर, नागपूर) यांच्या वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनाच्या मागील डाल्यामध्ये एकूण १0 नग गायी क्रु रनिर्यदयतेने डांबुन आखुड दोरीने बांधून त्यांना चारापाणी न देता अपुर्‍या जागेत दाटीवाटीने कोंबुन जनावरांना त्रास होईल, अशास्थितीत कत्तलीसाठी घेऊन जात होते.
घटनास्थळावरून आरोपीतांच्या ताब्यातुन १0 गायी प्रत्येकी किं. १५ हजार रुपयांप्रमाणे १ लाख ५0 हजार, वाहन किं. ५ लाख रुपये, असा एकूण ६ लाख ५0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र चटप करीत आहे. कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा रवींद्र डोरले, नापोशि रवींद्र चटप, चानापोशि गुणवंत्ता डाखोळे, पोशि सचिन येळकर, पोशि धोंडुतात्या देवकते, होम. सैनिक नानुसाव राऊत, होम सै. महेन्द्र भोयर, होम सै. डॅनियल तांडेकर यांनी केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.