सामान्य रुग्णालयात खाटांची अतिरिक्त सुविधा तात्काळ निर्माण करा- जिल्हाधिकारी

Share This News

  • आयसीयू खाटा40
  • ऑक्सिजन खाटा100
  • ऑक्सिजनचा साठा पुरेसा

भंडारा, दि.4:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य सुविधा अद्ययावत व सुसज्ज ठेवण्याला प्राधान्य देऊन सामान्य रुग्णालय भंडारा येथे आयसीयू 40 व ऑक्सिजन 100 खाटांची सुविधा तात्काळ निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. 140 खाटांची सुविधा चार ते पाच दिवसात उपलब्ध होईल अशी ग्वाही आरोग्य विभागाने यावेळी दिली.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. सामान्य रुग्णालया शेजारी असलेल्या नवीन इमारतीत अतिरिक्त खाटांची सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. या इमारतीत सध्या असलेले कोविड लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी स्थानांतरित करून 40 आयसीयू व 100 ऑक्सिजन बेड तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

            रुग्ण संख्या वाढत असून भविष्यात आयसीयू व ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये म्हणून अतिरिक्त बेडची सुविधा तातडीने उभी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. खाजगी रुग्णालयात सुद्धा 100 बेड वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नसून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रेमडेसिव्हीरचा साठा उपलब्ध असून अतिरिक्त लसीची मागणी नोंदविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

            सध्या जिल्ह्यात शासकीय असे 42 आयसीयू बेड, 67 व्हॅटिलेटर बेड, 156 ऑक्सिजन व अन्य मिळून 1252 बेड उपलब्ध आहेत. खाजगीमध्ये 133 ऑक्सिजन, 79 आयसीयू, 20 व्हॅटिलेटर व अन्य मिळून 278 बेड क्षमता आहे. असे असले तरी वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने अतिरिक्त बेड निर्माण करून अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.