तातडीच्या उपचारांनी वाचला बाळाचा जीव Immediate treatment saved the baby’s life

Share This News

नागपूर : अडगाव बुद्रुक येथील दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या दुर्धर आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी ३२ लाखांचा खर्च येणार असल्याचे कळताच त्याच्या साधारण परिस्थितीतील कुटुंबावर आभाळ कोसळले. बाळाच्या चिंतेने दु:खी झालेल्या या कुटुंबाच्या हाकेला शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीचा हात दिला. प्रहार रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून या बाळावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली.


अडगाव बुद्रूक येथील योगेश परिमल यांचा सात्विक या दोन वर्षांच्या मुलाला पोटाचा आजार झाला. सुरुवातीच्या काळात त्याचा फारसा त्रास जाणवला नाही. मात्र, अचानक दुखणे वाढले. त्यामुळे परिमल यांनी बाळाला अमरावतीला आणून डॉक्टरांकडे तपासणी केली. अमरावतीच्या डॉक्टरांनी त्यांना नागपूरच्या डॉक्टरांकडे पाठविले. नागपूरच्या डॉक्टरांकडून सात्विकच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला गाऊचर डिसिज आजार असल्याचे निदान झाले. या आजाराच्या उपचारांसाठी ३२ लाख रूपयांचा खर्च लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगताच परिमल यांच्यापुढे संकट उभे राहिले. परिस्थिती साधारण असल्याने एवढे पैसे कसे जमतील, याची चिंता त्यांना पोखरू लागली. त्यानंतर त्यांनी हिंमत बांधून स्वत:ला सावरले व राज्यमंत्री कडू यांच्याशी संपर्क साधला.
परिमल कुटुंबाची व्यथा जाणून घेतल्यानंतर कडू यांनी सहकारी नीलेश वाटाणे यांना मदत करण्याची सूचना केली. वाटाणे यांनी परिमल कुटुंबाला तत्काळ मुंबईला जायला सांगितले व मुंबई येथील सहकाऱ्यांना सात्विकच्या उपचारांसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार परिमल कुटुंब बाळासह मुंबईत पोहोचले. मुंबईत प्रताप तायडे यांनी परिमल कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था केली व तेथील एचआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये एका दिवसात उपचाराला सुरूवात झाली. उपचारानंतर सात्विकची प्रकृती चांगली झाली आहे. उपचारांसाठी आलेला ३२ लाखांवरील खर्च रुग्णकल्याण समितीकडून देण्यात आला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.