नागपुरात पुन्हा धावत्या रेल्वे प्रवाशांना लुटले In Nagpur, the looted train passengers were robbed again

Share This News

नागपूर : धावत्या रेल्वेत मोबाइल चोरत उड्या मारणाऱ्यांची टोळी रेल्वे पोलिसांच्या हाती लागली. मात्र धावत्या रेल्वेतील लुटीच्या घटना अद्यापही नागपूरच्या आसपासहून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर थांबलेल्या नाहीत. अशाच दोन घटना पुन्हा घडल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन्ही घटनांमध्ये धावत्या रेल्वेगाडीतून प्रवाशांच्या बॅगा बाहेर फेकत गाडीखाली उड्या घेऊन चोरटे पळून गेले. बिलासपूर-भगत की कोठी आणि विशाखापट्टनम-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वेत नागपूर-दिल्ली मार्गावरील भरतवाडा रेल्वे स्थानकाजवळ पहाटेच्या सुमारास या घटना घडल्या आहेत.


भगत की कोठी ही रेल्वेगाडी नागपूर रेल्वेस्थानकावर १२.३० वाजताच्या सुमारास पोहोचली. काही वेळ थांबून गाडी पुढील प्रवासाला निघाली. त्यावेळी चोरी करणारे आधीच गाडीत चढले होते. भरतवाडा रेल्वे स्थानकाजवळ गाडी येताच चोरट्यांनी साखळी ओढून गाडी थांबविली. त्यानंतर सर्व चोरटे महिलांच्या डब्यात शिरले. रात्री उशिर झाला असल्याने प्रवासी झोपेत होते. चोरट्यांनी ही संधी साधत महिलांच्या बॅग डब्याबाहेर फेकल्या आणि अंधाराचा फायदा घेत फरार झालेत. भगत की कोठी गाडी रवाना होत नाही तोच त्याच गाडीमागे असलेल्या विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे गाडीचीही साखळी ओढण्यात आली. गाडी थांबताच अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले. या गाडीलाही जवळपास १५ ते १७ मिनिटे रोखून धरण्यात आले होते. दोन्ही गाड्या भरतवाडा रेल्वे स्थानकापासून ३०० ते ५०० मीटर अंतरावर थांबविण्यात आल्या. विशेष म्हणजे या गाड्यांना भरतवाड्याला थांबा नाही. दोन्ही गाड्या इटारसीला थांबल्या. त्यामुळे प्रवाशांनी इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून बॅग जप्त केल्या. बॅगमधून सहा मोबाइल जप्त करण्यात आले. बॅगमधील रोख आणि दागिने घेऊन चोरटे पळून गेले होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.