नागपुरात लुटपाट करणारी टोळी पुलगावात पकडली

Share This News

नागपूर : नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी लुटपाट करून पुलगावात लपलेल्या टोळीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे.


प्रणय संजय ठाकरे (वय २०, रा. जुनीवस्ती खामला), रोहित रविदास डोंगरे (वय २०, रा. देवनगर) आणि दिनेश इंद्रपाल निंबोने (वय २५, रा. प्रतापनगर) ही अटकेतील लुटारूंची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी खापरी येथील रहिवासी व एम्समध्ये कार्यरत जितेंद्र बाबुलाल मलिक (वय ३५) यांना मारहाण करून लुटारूंनी त्यांच्याकडील मोटारसायकल, मोबाइल व सहा हजारांची रोख हिसकावली होती. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत, उपनिरीक्षक विकास मनपिया, हेडकॉन्स्टेबल तेजराम देवळे, रणधीर दीक्षित, विजय श्रीवास, सायबर सेलचे दीपक तऱ्हेकर, मिथुन नाईक, गोपाल देशमुख, बजरंग जुनघरे, नितीन बावणे, कुणाल लांडगे यांनी लुटारूंचा शोध सुरू केला. मलिक यांच्या चोरी गेलेल्या मोबाइलचे लोकेशन पोलिसांनी शोधले. त्यानुसार लुटपाट करणारे तिघेही पुलगावमध्ये असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी तेथुन तिघांना अटक केली. त्यांच्याकडून सोनेगाव, प्रतापनगर, तहसील आणि बेलतरोडीतील लुटपाटीच्या घटना उघडकीस आणल्या. पोलिसांनी लुटारूंकडून पाच मोटरसायकली, नऊ मोबाइलसह साडेचार लाखांचे साहित्य जप्त केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.