नागपुरात लॉकडाउनच्या विरोधात व्यापारी येणार रस्त्यांवर

Share This News

नागपूर : नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ३१ मार्चपर्यंत निर्बंध वाढविल्याचे जाहिर करताच नागपूर विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) या निर्णयाचा विरोध व्यक्त करीत सोमवारपासून लॉकडाउनविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पालकमंत्र्यांची लॉकडाउनविषयक बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असताना एनव्हीसीसीचे पदाधिकारी बैठकीच्या स्थळी पोहोचले. सतत दुकाने बंद असल्याने बाजारपेठेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. एनव्हीसीसीशी संलग्न १५० व्यापारी संघटनांनी आपापली दुकाने बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवार, २२ मार्चपासून व्यापारी रस्त्यांवर उतरून आंदोलन करू शकतात, असा धोका वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाउन ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय होण्यापूर्वीच नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कुणीही रस्त्यांवर येऊन लॉकडाउन किंवा जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करू नये, असा इशारा दिला होता. लॉकडाउनबाबत कोणत्याही संघटनेला किंवा राजकीय पक्षाला काही हरकत असल्यास त्यांनी पालकमंत्री किंवा राज्य शासनाशी संवाद साधावा असे आवाहन त्यांनी केले होते. अशातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना अतिरेकी बळाचा वापर करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे पालकमंत्री डॉ. राऊत ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध राहणार असल्याचे सांगत आहेत. अशात कडक निर्बंध आणि ते देखील बळाचा वापर न करता कसे ठेवायचे, असा पेच पोलिस विभागापुढे निर्माण झाला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.