जेवण सुरू असतानाच कलेक्टर आणि एसपी मंगल कार्यालयात | In the office of the Collector and SP Mars as the meal begins

Share This News

अहमदनगर,दि.23 : करोनाचा पुन्हा प्रसार होण्यामागे लग्नसमारंभातील गर्दी हे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. विवाह समारंभाला उपस्थितीचे बंधन असले तरीही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: विविध मंगल कार्यालयांत जाऊन कारवाई सुरू केली. त्यामुळे अन्य अधिकारी आणि विवाह आयोजकांची चांगलीच धावपळ उडाली. याशिवाय नगर जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी आणि अन्य नियम कडक करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील प्रशासन कामाला लागले आहे. करोनाचे आकडे वाढत असलेल्या ठिकाणी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातही आकडे वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नव्याने आदेश काढून निर्बंध कडक केले आहेत. तरीही लोक ऐकत नाहीत, हा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी स्वत: रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली. त्यानंतर यंत्रणा हलली.

रात्रीही संचारबंदीचा भंग करणाऱ्या आणि वेळेनंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेश काढत १५ मार्चपर्यंत जमावबंदी आणि रात्रीच्या नियंत्रित संचारबंदीचा आदेश दिला आहे. याशिवाय इतरही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना मनाई, रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत नियंत्रित संचारबंदी, करोना प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व आदेश लागू, विवाह समारंभाना फक्त ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी, अंत्यसंस्कारासाठी केवळ २० व्यक्तींना परवानगी, सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेपर्यंतच खुली ठेवता येणार, हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार, सहकारी संस्थांच्या वार्षिक सभेला ५० व्यक्तींना परवानगी. समारंभ, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा स्पर्धा, सण-उत्सव, उरूस, जत्रा या कार्यक्रमांना ५० व्यक्तींनाच उपस्थितीत राहता येईल. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. ‘नो-मास्क, नो-एन्ट्री’, हा नियम सर्वत्र पाळण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.