देशमुख प्रकरणी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिवसेनेत नाराजी वाढण्याचे संकेत, लवकरच बैठकीची शक्यता

Share This News

नागपूरः गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बचावाचे टोकाचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून होत असले तरी एकूणच परिस्थिती
देशमुखांच्या बाजुने नसल्याने त्यांचा राजीनामा घेणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह शिवसेनेत तयार झाला आहे. राष्ट्रवादीची तयारी नसल्याने नेमकी भूमिका ठरविण्यासाठी लवकरच शिवसेनेच्या आमदारांची बैठक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीने आरोप फेटाळताना देशमुख यांचा जोरदार बचाव सुरु केला असून स्वतः शरद पवार या बचाव कार्यात उतरले आहेत. मात्र, आता माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सादर केलेल्या अहवालाचीही माहिती आणि पुरावे पुढे येत असल्याने देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांच्यामुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस अधिक मलीन होत असल्याने त्यांचा राजीनामा घेणेच इष्ट ठरेल, असा मतप्रवाह शिवसेनेत तयार झाला आहे. या मतप्रवाहाला माजी मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याचाही आधार आहे. संजय राठोड यांच्यावर निव्वळ आरोपच झालेले आहेत. तथापि, उशिराने का होईना पण शिवसेनेकडून त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तोच न्याय गृहमंत्री देशमुख यांना का नाही? असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांकडून दबक्या आवाजात उपस्थित होतोय. या प्रकरणावर भाजप माघार घेण्याच्या स्थितीत नाही. सुबोध जयस्वाल यांनी सादर केलेला अहवाल आणि संभाषणाचे रेकॉर्डीग केंद्रीय गृहसचिवांना सादर करून सीबीआय चौकशीची मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केली जाणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेऊन पक्षातील विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.