इंडस पेपर मिलला भीषण आग; १५ कोटींच्या मालाची राखरांगोळी

Share This News

काटोल
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळीपासून २२ कि. मी. अंतरावरील सातनवरी शिवारातील जंगलात असलेल्या देशातील टिशू पेपर, किचन टॉवेल व टॉयलेट रोलचे उत्पादन करणारी सर्वांत मोठी इंडस पेपर मिल येथे सोमवार, ३ मे रोजी दुपारी ४ वाजतादरम्यान भीषण आग लागली. आगीत टिशू पेपर उत्पादनाकरिता विदेशातून आयातीत वेस्टेज कागद व तयार मालाच्या रिल सुमारे १५ कोटी रुपयांचा कागद जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नागपूर येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी सतत पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्याचा शर्तीने प्रयत्न केला. पण, सायंकाळी ८ वाजतापर्यंत आग धगधगतच होती.
कळमेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओरोगामी ग्रुपच्या मालकीची इंडस पेपर मिल आहे. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कंपनीच्या खुल्या आवारात ठेवलेल्या कागदाने अचानक पेट घेतला आग दिसताच इंडस कंपनीच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी कंपनीच्या पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. कंपनी सकाळी ८ ते दुपारी ४ च्या पहिल्या पाळीतील १६0 महिला पुरूष कामगारांना सुरक्षा कर्मचार्‍यांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नागपूर महानगर पालिकेचे अग्निशमन पथक दुपारी ४.३0 वाजता घटनास्थळावर पोहोचले. वाडी, हिंगणा, कळमेश्‍वर व सोलार कंपनीच्या अग्निशमन बंबाची आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, ही आग वाढतच गेली दरम्यान एम. आय. डी. सी. हिंगणा, नगर परिषद कळमेश्‍वर व नागपूर महानगर पालिका, असे एकूण पाच अग्निशमन बंबांनी सतत पाण्याचा मारा करूनही भीषण आग आटोक्यात आली नाही. कंपनीचे व्यवस्थापक शरद शिंदे यांनी कंपनीत एकूण जवळपास ४ हजार टन आयातीत कच्चा माल व तयार मालांच्या रिल्स, असा एकूण जवळजवळ १५ ते २0 कोटी रुपयांचा माल जळाला असल्याचे सांगितले. आग लागताच सर्वप्रथम शिरपूर गट ग्राम पंचायतचे सरपंच गौरीशंकर गजभिये यांनी गांवकर्‍यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. कळमेश्‍वर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एएसआय मोरेश्‍वर नागपुरे, पोलिस नायक माणिक शेरे, गजेंद्र निंबेकर, नीलेश डंभारे, दाऊद मोहम्मद आदी तातडीने घटनास्थळी पोहोचले व सर्वप्रथम बघ्याची गर्दी दूर केली व आग विझविणार्‍यांना मदत केली पुढील तपास कळमेश्‍वर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हाफिज राजा शेख करीत आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.