जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

Share This News

वारंगातील २३ कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर गावातील कोंबड्यांना मारण्याचा निर्णय

पशुसंवर्धन मंत्र्यांच्या जिल्ह्यातील पहिली घटना
कळमेश्‍वर व मौदा तालुक्यातील मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. कोंढाळी भागातील मृत पोपट आणि कबुतरांचे तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांचा अहवालही निगेटिव्ह आला होता. आता बर्ड फ्लूने जिल्ह्यात धडक दिल्यामुळे पोल्ट्री फार्म व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्या जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, आता जिल्हाभरातील सर्व पोल्ट्रीफार्मना पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने भेटी देऊन नमुने गोळा करण्याची गरज आहे.


दररोज देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लू आपले पाय पसरवित असल्याचे दिसून येत आहे. आता नागपूर जिल्ह्यातही या आजाराचा शिरकाव झाला आहे. बुटीबोरीजवळच्या वारंगा गावातील २३ कोंबड्या मृत झाल्या होत्या. त्यांचे नमुने १४ जानेवारीला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजता कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या गावातील कोंबड्यांना ठार मारण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील दोन पोल्ट्री फार्म व एका शेतात शेतकर्‍यांकडील कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ माजली होती. यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या तिन्ही ठिकाणच्या कोंबड्यांचे नमुने घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये तपाणीसाठी पाठविले. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला. अहवालात या कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता. मात्र, बुटीबोरी नजीकच्या वारंगा व कळमेश्‍वर परिसरातील धापेवाडाजवळील एका गावातील कोंबड्यांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त व्हायचे होते. वारंगा गावात २३ कोंबड्या मृत झाल्या होत्या. त्यांचे नमुने १४ जानेवारीला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजता कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या गावातील कोंबड्यांना ठार मारण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीनंतर मंगळवारी सायंकाळी पशुसंवर्धन विभागाचे पथक वारंगा गावाकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांनी एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या ठार मारण्याची कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ६५0 कोंबड्यांना मारण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांना जमिनीत पुरण्यात आले. दरम्यान, यापूर्वी कळमेश्‍वर व मौद्यातील कोबड्यांचे अहवाल हे निगेटिव्ह आले होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.