पशुसर्वधन विभागाकडून काटोल तालुक्यावर अन्याय – चंद्रशेखर कोल्हे
नागपूर
अतिदुर्गम भाग येत असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या स्थापनेपासून जिल्ह्यतील काटोल व देवलापार येथे फिरता पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यात आला होता. परंतु काटोल येथील दवाखान्याचे वाहन हे गेल्या सहा वर्षांपासून नादुरुस्त आहे. या वाहनाची मागणी जनप्रतिनिधींनी अनेक वेळा केली. नुकतेच मुख्यमंत्री यांनी नागपूर जिल्ह्यांसाठी ३ वाहने मंजूर केली आहे. परंतु यापैकी एकाही वाहन हे काटोलला देण्यात आले नाही. हा एकाप्रकारे काटोल तालुक्यावर अन्याय असल्याचा आरोप जिल्हा परिषदमधील राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांनी केला आहे.
काटोल तालुक्यातील ५0 टक्के भाग हा दुर्गम आहे. यामुळे या तालुक्याची निवड ही मानव विकास कार्यक्रमात करण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात दुर्गम भाग असल्याने या भागातील पशुपालकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी काटोल येथे फिरता पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यात आला आहे. यासाठी वेगळी पदभरतीसुध्दा करण्यात आली आहे. परंतु या दवाखान्यातील वाहन हे गेल्या सहा वर्षांपासून नादुरुस्त आहे. यामुळे दुर्गम भागातील पशु आरोग्य सेवा ही बंद आहे. या फिरत्या दवाखान्याला नवीन वाहन मंजूर करण्यासाठी गेल्या एक वर्षांपासून सातत्याने आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे चंद्रशेखर कोल्हे यांनी सांगितले. नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यासाठी पशुसंर्वधन विभागाला तीन नवीन वाहन दिले आहे. यातून एक वाहन काटोल येथील फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणे क्रमप्राप्त होते. परंतु नागपूर जि.प.च्या पशुसंर्वधन विभागाने काटोलच्या मागणीकडे जानीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.