अमरावतीत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Share This News

अमरावती-तीन महिन्यांपूर्वी तिवसा पोलिस स्टेशन हद्दीतील गुरुकुंज मोझरी येथील एटीएम वर कार्डची अदलाबदल करून पळविलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून अमरावती येथील एटीएममधून 37 हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपासणी करणार्‍या अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यामध्ये आंतराज्यीय टोळीच सक्रिय असल्याचे लक्षात आल्यानंतर या टोळीला पकडले आहे. त्यांच्या कडून वेगवेगळ्या बँकेचे 13 एटीएम कार्डही जप्त करण्यात आले आहे.

तिवसा पोलिस स्टेशन हद्दीतील गुरुकुंज मोझरी येथील एचडीएफसीच्या एटीएम मध्ये 28 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता स्मिता पंजाब जोल्हे या पैसे काढण्यास गेल्या असता तेथे कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून अमरावती येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून 37 हजार रुपये काढून फसवणूक केली होती. याबाबत फिर्यादी जोल्हे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला गुन्हा तपासात घेतला असता सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक शाखेने हाती घेत यातील आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणातील आरोपी हे गुडगाव, हरियाणा येथील असून त्यांचे सीसीटीव्ही फुटेज व सीडीआरचे विश्लेषण करून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पिदूरकर व पोलिस अंमलदार यांनी तपास लावला. 21 जानेवारी 2021 रोजी आरोपींना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी तिवसा येथील एटीएममधून एका महिलेचे हातचलाखीने पासवर्ड पाहून एटीएम कार्ड बदली केले व त्याचा वापर करून महिलेच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचे कबूल केले. साजिद खुर्शीद, वय 28 व निसार अख्तर हुसैन, वय 38, रा. हरियाणा राज्य, अशी आरोपींची नावे असून त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असल्याची सूत्रांनी माहिती देतांना सांगितले.

या आरोपींनी महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, अमरावती शहर, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना, शिर्डी, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या मार्गाने प्रवास केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याच प्रवासादरम्यान आरोपींनी गुन्हे केल्याने ते गुन्हे सुद्धा उघड होण्याची शक्यता असल्याचे कळविले आहे. सदर आरोपी हे सीसीटीव्ही फुटेजमधील असल्याचे दिसून आले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे 13 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले चारचाकी वाहन सुध्दा जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा यशस्वी तपास पोलिस अधीक्षक हरिबालाजी एन., अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आनंद पिदूरकर व त्यांच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने केला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.