प्रतापनगरात कुत्र्याच्या एका निष्पाप पिलाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना
नागपूर : शहरातील पांढरपेशांची वस्ती अशी ओळख असलेल्या प्रतापनगरात कुत्र्याच्या एका निष्पाप पिलाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सैतानालादेखील मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रकाराची पोलिस तक्रार देण्यात आली असून प्राणिप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ‘सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन’च्या संस्थापिका स्मिता मिरे या गुरुवारी सकाळी त्यांच्या श्वानाला फिरविण्यासाठी घेऊन गेल्या असताना गणेश कॉलनीतील मैदानाजवळ त्यांना काहीतरी जाळल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता दीड ते दोन महिन्याचे कुत्र्याचे पिल्लू होते. त्यांनी जवळपास विचारणा केली असता हा प्रकार कधी झाला व कुणी केला याबाबत कुणालाही काहीच कल्पना नव्हती.
मिरे यांनी त्यानंतर थेट राणाप्रतापनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम २८९, कलम ४२८ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.