जगाचा निरोप घेण्याची वेळ आली…! वादग्रस्त पोलिस अधिकारी वाझेच्या पोस्ट ने प्रचंड खळबळ It’s time to say goodbye to the world…! Huge uproar over controversial police officer Waze’s post

Share This News

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप असलेले मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये हे जग सोडण्याचा उल्लेख केल्याने खळबळ माजली असून वाझे यांना त्यातून नेमके काय सांगायचे आहे, यावर चर्चा सुरु झाली आहे.


ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन प्रकरणी वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिरेन यांची पत्नी विमला यांनी वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्याचा आधार घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्याची पाळी गृहविभागावर आली. तर हिरेन मृत्यूप्रकरणाचा गुन्हेशाखेकडील तपास एटीएसकडे सोपविला गेला. वाझे यांची पोलिसांकडून चौकशीही सुरु आहे. मात्र, अचानक वाझे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरील उल्लेखाने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. २००४ मध्ये आपल्याला सीआयडीने खोट्या प्रकरणात अटक केली होती. त्यात आजवर काहीच निष्पन्न झालेले नसताना आता इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा उल्लेख वाझे यांनी केला आहे. आपले सहकारी मला पुन्हा अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिस्थितीत फरक इतकाच की १७ वर्षे आपल्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती. मात्र, आता माझ्याकडे आयुष्याची ती १७ वर्षे नाही. नोकरी करण्याचा संयमही नाही. आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत असल्याचे आपल्याला वाटते, असेही वाझे यांनी म्हटले आहे. वाझे यांना यातून नेमके काय म्हणायचे आहे, हे अस्पष्ट आहे. वाझे यांची पोलिसांकडून केवळ चौकशी झाली आहे. त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नसली तरी वाझे यांनी अटकेच्या शक्यतेने ठाणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी अपेक्षित आहे. वाझे यांची बदली नागरी सुविधा केंद्रात करण्यात आली होती. मात्र, लगेचच त्यांची बदली विशेष शाखेत करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.