जळगाव : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

Share This News

आभोळा गावावर शोककळा

जळगाव – यावल तालुक्यातील किनगावाजवळ अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर रविवारी मध्यरात्रीनंतर पपई वाहून नेणारा ट्रक उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण पंधरा जणांचा मृत्यू झाला असून मृतांमधील दहा जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रावेर तालुक्यातील आभोळा गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील आभोळ, केऱ्हाळा, रावेर शहरातील काही मजूर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गावांमधून पपई ट्रकमध्ये भरण्यासाठी गेले होते. ट्रकमध्ये पपई भरल्यानंतर सर्वजण रावेरकडे परत येत होते. त्यावेळी चालकाचे ट्रकरवील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटला. रस्त्यांवरील खड्यांमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

अपघात एवढा भीषण होता की, यात ट्रकखाली दबून 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी अपघात घडल्याने लवकर मदतही मिळू शकली नाही. वेळेत मदत न मिळाल्याने काही जखमींचाही मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सात पुरूष, सहा महिला आणि दोन बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर होते. यापैकी जखमी मजूरांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना दोन लाखाची मदत –
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अपघातातील मृत मजूर हे रावेल तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.