शहीद कैलासवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Share This News

नागपूरहून २७ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या दरम्यान कैलास दहीकर यांचे पार्थिव पिंपळखुटा येथे दाखल झाले. तत्पूर्वी परतवाडा शहरासह मार्गातील धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी येथील आबालवृद्धांनी हातात तिरंगा घेत मार्गावर उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पिंपळखुटा गावासह देवगाव परिसरात प्रत्येक घरापुढे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम पिंपळखुटा येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टररूपी रथावर ठेवून ते अंत्यसंस्कार स्थळी आणले गेले

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहीकर यांच्या पार्थिवावर देवगाव शिवारात सातपुडा पर्वताच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला. या दरम्यान सैन्य दलासह राज्य पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मेळघाटच्या पंचक्रोशीतून याप्रसंगी जनसागर उसळला होता. ‘अमर रहे, अमर रहे’, ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नागपूरहून २७ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या दरम्यान कैलास दहीकर यांचे पार्थिव पिंपळखुटा येथे दाखल झाले. तत्पूर्वी परतवाडा शहरासह मार्गातील धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढी येथील आबालवृद्धांनी हातात तिरंगा घेत मार्गावर उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पिंपळखुटा गावासह देवगाव परिसरात प्रत्येक घरापुढे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम पिंपळखुटा येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टररूपी रथावर ठेवून ते अंत्यसंस्कार स्थळी आणले गेले. दत्तप्रभू आश्रमशाळेमागील गजानन येवले यांच्या शेतात शासकीत इतमामात कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. ज्या तिरंग्यात त्यांचे पार्थिव आणले गेले, तो सैन्यदलाकडून त्यांची पत्नी बबली यांच्या स्वाधीन करण्यात आला. आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगीसह नातेवाइकांनी त्यांचे मुखदर्शन घेतले. लहान भाऊ केवल दहीकर याने कैलासच्या पार्थिवाला अग्नी दिला. तत्पूर्वी, राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी, तर प्रशासनाच्यावतीने उपविभागीय

अधिकारी संदीपकुमार अपार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राज्यमंत्री बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवलराम काळे, खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, बहादुर आजी-माजी सैनिक संघ, देवगावचे सरपंच गजानन येवले, सुरेखा ठाकरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. अखेर राष्ट्रगीतासह ‘अमर रहे’च्या जयघोषाने शहीद कैलास दहीकर यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी महिलांसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.  वीरपत्नीला तिरंगा  कैलास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपळखुटा गावालगतच्या मैदानावर सरण रचण्यात आले. त्यावेळी पत्नी बबली दहीकर यांना  सैन्यदलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या धाय मोकलून रडल्या. कैलास यांचे बंधू केवल यांनी शहीदाच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले. गावकऱ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून लाडक्या ‘फौजी’ला श्रद्धांजली वाहिली. भूमीचा गौरव   कैलास दहीकर यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या सुपुत्राने येथील भूमीचा गौरव वाढवला आहे. दहीकर कुटुंबाची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे. आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी साहाय्य करू, असे मत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. बलिदान प्रेरणादायी शहीद कैलास दहीकर यांचा त्याग व बलिदान सर्वांना प्रेरणा देणारे आहे, अशी भावना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. खासदार नवनीत राणा, पिंपळखुट्याचे सरपंच गजानन येवले यांनी श्रद्धांजली दिली


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.