प्रॉपर्टीच्या वादातून केली निर्घृण हत्या
नागपूर |
बेलतरोडी हद्दीत असलेल्या प्लॉटवरील बांधकामावरून भांडण झाल्याने कमाल चौकात एका चायनिज ढाब्यावर एका सायकल स्टॅण्ड चालकाची हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता.१७) सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास घडली. महेश दुर्गाप्रसाद तिवारी ऊर्फ गुड्डू तिवारी असे मृताचे नाव आहे. तर मोहसीन ऊर्फ पिंटू किल्लेदार आणि विवेक पांडुरंग गोडबोले असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गणेशपेठ येथे राहणारे गुड्डू तिवारी हे न्यायमंदिर परिसरात सायकल स्टॅण्ड चालवित होते. तसेच त्यांचा प्रॉपर्टीचाही व्यवसाय होता. त्यांनी बेलतरोडी येथे एक प्लॉट खरेदी केला होता. तेथे शेजारीच आरोपी विवेक गोडबोले याचाही प्लॉट आहे. विवेक हा प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतो. त्याचे काश्मिरी गल्ली येथे कार्यालय आहे. तर मोहसीन याची चहा टपरी आहे. गुड्डू तिवारी यांना त्यांच्या प्लॉटवर बांधकाम करायचे होते. पण, तेथील बांधकामावरून विवेक आणि गुड्डू तिवारी यांच्यात अनेकदा भांडण झाले होते. कालही त्यांच्यात भांडण झाले. त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्यात बैठक करण्याचे ठरले. विवेकच्या कार्यालयात काम करणार्या एका मुलीने मोहसीन याला मॉडेल टाऊन येथून कारमध्ये बसवून कमाल चौकातील चायनिज ढाब्यावर आणले. विवेकही त्यांच्यासोबत होता. भांडणावर तोडगा काढण्यासाठी गुड्डू तिवारी, पिंटू आणि विवेक हे कमाल चौकातील नीलेश पिल्लेवार यांच्या चायनिज ढाब्यावर भेटले. दुपारी १ वाजतापासून ते सर्व तेथे होते. पण, समझोत्यादरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने पिंटू आणि विवेकने चायनिज ढाब्यातील चाकू आणि बॉटल उचलून गुड्डू तिवारीवर प्राणघातक हल्ला केला. गुड्डूच्या डोक्यावर त्यांनी बॉटल फोडली आणि त्यांच्या छातीत तेथे ठेवलेल्या चाकूने प्राणघातक वार केला. यात गुड्डू यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. आरोपी आणि गुड्डू तिवारी यांच्यात १ वाजेपासूनच भयंकर भांडण सुरू होते. मात्र, चायनिज ढाब्याचा मालक नीलेश याने याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेली मुलगी वर्धेची होती. ती वर्धेला परत गेली. या खुनात मुलीची नेमकी काय भूमिका होती, याबाबत अज्ञाप माहिती मिळू शकली नाही. |