यवतमाळमधील किसान महापंचायत होणारच

Share This News

नागपूर,दि.19 :– संसदेने पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांकडून दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या सर्मथनार्थ येत्या २0 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे किसान महापंचायतचे (शेतकरी महामेळावा) आयोजन करण्यात आले. परंतु आता वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी या महापंचायतची परवानगी नाकारली आहे. मात्र, आयोजकांनी कोरोनाच्या नियमानुसार सभा घेण्यासंदर्भात नव्याने अर्ज सादर केला असून, हा अर्ज सध्यातरी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रलंबित आहे. परंतु यवतमाळची सभा ही कोरोनाचे नियम पाळून ठरलेल्या दिवशी त्याच ठिकाणी त्याच वेळी होईल आणि सभेला संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत हे मार्गदर्शनही करतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाचे विदर्भ संयोजक शेतकरी नेते श्रीकांत तराळ आणि महासंघाचे कोअर कमिटी सदस्य व महाराष्ट्राचे संयोजक संजय गिड्डे पाटील यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे गिड्डे पाटील व तराळ यांनी सांगितले की, दिल्लीत सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन हे दोन चार राज्यापुरते र्मयादित नसून, ते देशव्यापी आहे. हे सरकारला कळावे म्हणून देशात विविध ठिकाणी किसान महापंचायत होत आहेत. महाराष्ट्रातही त्यासाठीच आयोजन करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेला जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ याच यवतमाळ जिल्ह्यात केली होती. याच ठिकाणी त्यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, स्वामीनाथन आयोग पूर्णपणे लागू करण्याचे आणि एमएसपी लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे या सभेसाठी यवतमाळ जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तब्बल एक लाख लोक या सभेला येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. तयारीही पूर्ण झाली, परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने थोडी अडचण आली. जिल्हाधिकार्‍यांनी या महासभेला परवानगी नाकारली. यासोबतच कोरोनाची नियमावली सादर केली. या कोरोनाच्या नियमावलीनुसार सभा घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे आजच नव्याने अर्ज सादर करण्यात आला आहे. अद्याप तरी हा अर्ज जिल्हाधिकार्‍यांकडे प्रलंबित आहे. प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. पूर्वीसारखी सभा होणार नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळून सभा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भंते महेंद्र रत्न, सुनील चोखारे, मलिकंतसिंग बल आदी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.