अकोल्यात सलाईनच्या नळीने गळा आवळून कोविड रुग्णाची आत्महत्या

Share This News

अकोला : अकोला शासकीय रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका करोना बाधित रुग्णाने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक दहामध्ये हा प्रकार घडला. सदर व्यक्ती कर्करोगानेही ग्रासलेला होता आणि आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर अकोला शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पातुर येथील रहिवासी असलेल्या या ५७ वर्षीय रुग्णावर गेल्या काही दिवसांपासून अकोला शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डात उपचार सुरू होते. मुख्य म्हणजे कोविडवर मात करण्यात या रुग्णाने यशही मिळवले होते. शनिवारी करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता व त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्याआधीच त्याने आपली जीवनयात्रा संपवली. वॉर्डातील इतर रुग्णांना संशय येवू नये म्हणून अंगावर चादर घेऊन सलाईनच्या नळीने रुग्णाने आपला गळा आवळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार काही वेळाने लक्षात येताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली. वॉर्डातील इतर रुग्णांना हा प्रकार पाहून मोठा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णाला अन्न नलिकेचा कर्करोग होता. नागपूर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. हा कर्करोग चौथ्या स्टेजवर असल्याने प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नातेवाईकांनी त्यांना तिथून हलवले होते. मुर्तिजापूर येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अकोला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यात त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.