महाराष्ट्र उच्च शिक्षणात अग्रेसर – माजी कुलगुरु तथा उच्च शिक्षण संचालक डॉ.एस.एन.पठाण

Share This News

नवी दिल्ली : उच्च शिक्षणात महाराष्ट्र अग्रेसर असून भविष्यातही राज्याचा हा आलेख उंचावेल, असा आशावाद माजी कुलगुरु तथा उच्च शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पठाण यांनी आज व्यक्त केला.    

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘उच्च शिक्षण काल, आज आणि उद्या’ या विषयावर डॉ. पठाण बोलत होते.

महाराष्ट्राने गेल्या ६० वर्षांत उच्च शिक्षणात मोठी भरारी घेतल्याचे सांगून डॉ.पठाण यावेळी म्हणाले, आजमितीस राज्यात एकूण ६२ विद्यापीठे आणि ३ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. यात २३ राज्य विद्यापीठ, २१ अभिमत विद्यापीठ, ११ खाजगी विद्यापीठे आदींचा समावेश आहे. राज्यात वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. शासनाच्या जोडीलाच खाजगी शिक्षण संस्थांनीही राज्याच्या उच्च शिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची आज विविध महाविद्यालये आहेत. विदर्भात शिक्षणमहर्षी  पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचीही अनेक महाविद्यालये आहेत. पुणे जिल्हा शिक्षण संस्था तसेच नाशिक, अहमदननगर आदी जिल्ह्यांमध्ये मराठा विद्याप्रसारक मंडळांची महाविद्यालये आहेत.

राज्यातील सहकार क्षेत्रानेही शिक्षणात मोलाचे योगदान दिले असून सहकारी साखर कारखान्यांनी आपापल्या परिसरात शाळा-महाविद्याये उभारून शिक्षणाचे मोठे जाळे तयार केले आहे, असेही डॉ. पठाण म्हणाले.  राज्याची शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे मात्र, गुणात्मक शिक्षण हे उच्च शिक्षणासमोरील मोठे आवाहन असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविधतेत एकता हे भारत देशाचे बलस्थान आहे. देशात झालेल्या शिक्षणाच्या प्रगतीने देश विकासपथावर अग्रेसर झाला आहे. महाराष्ट्रानेही यात मोलाचे योगदान दिले आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या न्यायाने ब्रिटीश सत्तेने भारत देशाला कमजोर करण्यासाठी लॉर्ड मेकॉलेंची शिक्षण पद्धती रूजवून भारतीयांमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतंत्र भारतात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आणि या बदलात महाराष्ट्राचे अग्रगण्य स्थान असल्याचे डॉ.पठाण म्हणाले.

देशात गेल्या ७५ वर्षात उच्च शिक्षण संस्थांचा वाढता आलेख

एकीकडे महाराष्ट्र स्थापनेचे हीरक महोत्सव साजरे होत असताना भारत देशाचेही हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण संस्था स्थापन झाल्याचे डॉ. पठाण म्हणाले. देश स्वतंत्र झाला तेव्हा मुंबई, मद्रास आणि कोलकाता या प्रमुख विद्यापीठासह २५ विद्यापीठे होती आज ही संख्या वाढून देशात एकूण ९६७ विद्यापीठे कार्यरत आहेत. यात ४१८ राज्य विद्यापीठे, १२५ अभिमत विद्यापीठ, ५४ केंद्रीय विद्यापीठ आणि ३७० खाजगी विद्यापीठांचा अंतर्भाव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ५६५ महाविद्यालये होती ही संख्या वाढून आज ३० हजार झाली आहेदेश स्वतंत्र झाला तेव्हा १८ हजार विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते आज ही संख्या २.५ कोटी एवढी झाल्याचे त्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.