“सुधीरभाऊंचं भाषण ऐकताना नटसम्राट बघतोय असा भास झाला!” – उद्धव ठाकरेंचा मुनगंटीवारांना टोमणा “Listening to Sudhirbhau’s speech, it seemed that Natsamrat was watching!” – Uddhav Thackeray scolds Mungantiwars

Share This News

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष भाजपानं राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी सरकारच्या धोरणांवर तोंडसुख घेतलं आहे. त्यापैकी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून आगपाखड केली आहे. बुधवारी जळगाव महिला वसतिगृहातील प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांनी सत्ताधाऱ्यांना परखड शब्दांत सुनावलं होतं. इतरही मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. मात्र, यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. यामध्ये “सुधीर मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, असं म्हणत त्यांनी मुनगंटीवारांना देखील कोपरखळी मारली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा सुधीर मुनगंटीवार विधानसभेत उपस्थित नव्हते. तेव्हा, “आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि आमच्या प्रत्येक कृतीला काही ना काही आधार आहे. माझी अपेक्षा अशी होती की निदान मी उत्तर देताना ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले, ते हजर राहिले असते तर बरं झालं असतं”, असं मुख्यमंत्री म्हणाले, तेवढ्यात सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी “व्हेरी गुड”, अशी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाच्या स्टाईलवरून यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोमणा मारला. “मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. कामकाज ऐकताना अचानक मला भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी अथेल्लो, मी हॅम्लेट…आणि शेवट असा केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का किंमत! सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश.. देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की आमचं कसं होणार? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“सुधीरभाऊ, माझ्यासारखंच तुमचं झालंय” यावेळी, “माझं जसं झालंय, तसंच तुमचंही झालंय. कलागुणांना वाव नाही हो या क्षेत्रात. मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली. आता बंद आहे. पण कलाकार कुठे थांबून नाही राहात. जिथे संधी मिळेल, तिथे कला उचंबळून येते. पण सुधीरभाऊ, ती मारू नका”, असंही उद्धव ठाकरे सुधीर मुनगंटीवारांना म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.