राज्यात फक्त विकेंडला लॉकडाऊन, इतर दिवशी कडक निर्बंध

Share This News

संपूर्ण लॉकडाऊनला तीव्र विरोधानंतर मंत्रिमंडळाता मध्यममार्ग

मुंबईः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तीव्र विरोध दर्शविल्याने फक्त शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा तसेच इतर दिवशी कठोर निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. करोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू राहणार असून ते उद्या सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून लागू राहणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.
राज्याचे मंत्री नवाब मलीक आणि अस्लम शेख यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. शनिवार आणि रविवारी राहणारे लॉकडाऊन हे शुक्रवारी रात्री ८ वाजता सुरु होऊन ते सोमवारी सकाळी ७ वाजतापर्यंत असेल. या लॉकडाऊनच्या दिवसांना केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवता येतील. त्यात नागरिकांना अडचणी येऊ नये यासाठी रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना पार्सलची सुविधा ठेवता येणार आहे. त्यासोबतच इतर दिवशी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय झाला असून ते उद्यापासूनच लागू केले जाणार आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून आजच जारी केल्या जाणार आहेत.
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कार्यालये पन्नास टक्के क्षमतेने चालू असतील तर खासगी क्षेत्रातील कार्यालयाने वर्क फ्रॉम होम बंधनकारक राहणार असले तरी या क्षेत्रातील उत्पादन विभागांना मुभा राहणार आहे. मॉल, धार्मिक स्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह, ब्युटी पार्लर, सलून्स, जिम पूर्णपणे बंदच राहतील. अत्यावश्यक दुकाने सुरु ठेवता येतील. किराणासह अत्यावश्यक दुकानांसाठी काही वेळा निश्चित केल्या जाणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.