मा. गो. वैद्य अनंतात विलीन, संघप्रमुख भागवत अन् गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Share This News

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले प्रवक्ते, माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख, हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार ज्येष्ठ संपादक बाबुराव उपाख्य माधव गोविंद वैद्य अर्थात मागो अनंतात विलिन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंबाझरी स्मशानभूमीत डिझेल शवदाहीनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र धनंजय यांनी अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, राज्याचे माजी माहिती संचालक सहस्रभोजनी, संघाचे प्रचारक प्रसाद महानकर, गणेश शेटे, क्षितिज गुप्ता, आ. परीणय फुके, आ. विकास कुंभारे यांच्यासह वैद्य कुटुंबीयांचे आप्त व चाहते उपस्थित होते.   रविवार सकाळी ९.३० वाजता त्यांचे राहते घर ८०, विद्याविहार, प्रतापनगर, येथून अंत्ययात्रा निघाली. अंबाझरी घाटावर दोन मिनिटे माैन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाचा शब्दकोष हरवला – मोहन भागवत अंत्ययात्रेपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वंन केले. वैद्य यांच्या जाण्याने संघाचा शब्दकोश हरवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते संघ विचार जगले. सल्लामसलत करण्याचे ते हक्काचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने आता काही विचारायचे ते कुठे, असा रिक्तपणा निर्माण झाला आहे. जीवन कसे जगावे याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले, अशी शोकसंवेदना भागवत यांनी व्यक्त केली. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी रात्री घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वंन केलेे. ३१ डिसेंबरला श्रद्धांजली सभा    ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृह येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.