‘महानिर्मिती’ची विक्रमी १०४४५ मेगा वॅट वीज निर्मिती Mahanirmiti’s record 10445 MW power generation

Share This News

मुंबई, १० मार्च : देशातील एक अग्रगण्य वीजनिर्मिती कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या महानिर्मितीने मंगळवारी दुपारी ४.४० वाजता एकूण १०,४४५ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक नवा इतिहास रचला आहे.

            वीज निर्मितीमध्ये कोळसा व्यवस्थापन सर्वात महत्वाचे असते. डॉ. राऊत यांनी ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील औष्णिक वीज केंद्राची उत्पादन क्षमता अर्थात प्लांट लोड फॅक्टर वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. राज्य वीज नियामक आयोगाने वीज केंद्रांची उत्पादन क्षमता किमान ८५ टक्के असायला हवी असे बंधन घातले आहे. डॉ. राऊत यांनी ही क्षमता किमान ९५ टक्के गाठण्याचे लक्ष्य महानिर्मितीला आखून दिले. त्यानुसार कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला. गुणवत्तापूर्ण कोळसा न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देऊन कमी गुणवत्तेच्या कोळशामुळे वीज निर्मिती क्षमतेतील घट थांबविण्याचा प्रयत्न केला.

            डॉ. राऊत यांनी 6 जानेवारी २०२० रोजी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्यादिवशी महानिर्मितीचे एकूण वीज उत्पादन ६ हजार ८२१ मेगा वॅट होते. यात ४ हजार ८०४ मेगा वॅट औष्णिक वीज निर्मितीचा समावेश होता. आज ९ मार्च २०२१ रोजी एकूण (पिक) वीज उत्पादन १० हजार ४४५ मेगा वॅट असून यात ७ हजार ९९१ मेगा वॅट औष्णिक वीजेचा समावेश आहे. वर्षभरात औष्णिक वीज उत्पादन जवळपास दुपटीने वाढले आहे तर एकूण वीज उत्पादन हे जवळपास ४ हजार मेगा वॅटने वाढले आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले महानिर्मितीचे अभिनंदन

            ” महानिर्मितीने आज राज्याच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक वीज निर्मितीचा विक्रम रचला याचा मला खूप आनंद होत आहे. हा इतिहास रचणाऱ्या महानिर्मितीतील सर्व अधिकारी, तंत्रज्ञ यांचे विशेष अभिनंदन करतो,” अशा शब्दात ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आपला आनंद व्यक्त केला.

            ” वीज निर्मितीसाठी प्रभावी इंधन व्यवस्थापन, इंधनाचा आवश्यक तो साठा करणे, वीज निर्मिती संचात बिघाड झाल्यावर लगेच दुरुस्ती करणे आणि संचात बिघाड होण्याची वेळच येणार नाही अशा पद्धतीने ऑपरेशन आणि मेंटेनन्स करणे यावर आम्ही सातत्याने भर देत आहोत. याशिवाय वीज उत्पादन खर्च कमी करण्याचेही प्रयत्न करीत आहोत. त्याचे सुखद परिणाम आता दिसू लागले आहेत,” असेही डॉ. राऊत म्हणाले.

महानिर्मितीचा चढता आलेख

            मार्च महिन्यात राज्य सरकारच्या महानिर्मिती कंपनीची कामगिरी अधिकाधिक उंचावत आहे. ५ मार्च रोजी राज्यातील ९औष्णिक वीज निर्मिती केंद्रांनी किमान ९० टक्के वा त्याहून अधिक प्लांट लोड फॅक्टर प्राप्त करून विक्रम रचला. यापूर्वीचा २० मे २०१९ रोजीचा १०,०९८ मेगावॅट चा उच्चांक मोडताना महानिर्मितीने आधी १०,२७५ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य केली व त्यात सातत्य राखत आता दु ४.४० वाजता आजचा स्वतःचाच विक्रम मोडून १०४४५ मेगावॅट वीजनिर्मिती ची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

            यामध्ये औष्णिक वीज निर्मितीद्वारे ७९९१ मेगा वॅट , वायू वीज निर्मिती केंद्राद्वारे २६४ मेगा वॅट तर जल विद्युत केंद्राद्वारे २१३८ मेगा वॅट आणि सौर ऊर्जा प्रकल्पामधून ५० मेगा वॅट इतकी वीज निर्मिती करण्यात आली आहे. या वेळी महावितरणची विजेची मागणी २२१२९ मेगा वॅट होती तसेच राज्याची एकूण वीजनिर्मिती १६४२९ मेगावॅट इतकी होती.

            १०,००० पेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. दि ८ मार्च रोजीही महानिर्मिती ने १०,०९७ मेगावॅट निर्मिती साध्य केली होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.