Maharashtra Weather : पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, गारांसह मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात राज्यात पुण्यानंतर आता विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यामुळे पुढे काही दिवस पाऊस होणार आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिवाळ्यामुळे आधीच वातावरण थंड आहे त्यात पाऊस पडल्याने वातावरणात आणखी गारवा पसरला आहे.
खरंतर, संपुर्ण राज्यावर पावसाचं सावट आहे. काल गोंदिया, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात गारपिटीची नोंद झाली. आज कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 19 फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
पुण्यातही पावसाचा इशारा
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडं राहिल. यामुळे पुणेकरांनी आणि घाटमाथ्यावरील गावांनी काळजी घेत आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?
18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.
शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे