गव्हाच्या पिठापासून तयार करा केकपासून ते बर्फीसारख्या पौष्टिक रेसिपी

Share This News

1. कणकेचे लाडू
अनेकांचा लाडू वीक पॉइंट असतो. विशेष म्हणजे हा असा पदार्थ आहे ज्याला ऋतुमानाचं काही बंधन नसतं. रोजच्या जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खायला आणि मुख्य म्हणजे करायलाही अगदी सहजसोपा पदार्थ म्हणजे कणकेचे लाडू.

साहित्य- तूप, कणिक, साखर, सुका मेवा, वेलची पूड, सुकं खोबरं
कृती- प्रथम एका कढईत कणिक भाजून घ्या. नंतर कढईत अर्धी वाटी तूप घ्या. त्यात भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ घाला. तुम्ही जर एक वाटी गव्हाचं पीठ घेत असाल तर एक वाटी साखर घाला. साखरेचं प्रमाण कमी ठेवू शकता. हे मिश्रण तीन मिनिटं हलवत राहा. तुमच्या आवडीनुसार त्यात सुका मेवा घाला आणि गॅस बंद करा. लाडूचं हे मिश्रण एका ताटात काढून थंड होऊ द्या. नंतर त्यात वेलची पूड घालून परत एकदा मिश्रण एकजीव करा आणि लाडू वळून घ्या. तुम्हाला हवं असल्यास त्यात सुकं खोबरं देखील घालू शकता. मुख्य म्हणजे लाडू वळल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा.

2. हलवा
गाजर किंवा दुधी हलवा करताता हे ऐकलं असेल. पण, तुम्ही कधी कणकेचा हलवा खाल्लाय का? काही जण याला कणकेचा शिरा असंही म्हणतात.
साहित्य- दोन वाटी कणिक, अर्धी वाटी साखर, वेलची पूड, एक वाटी तूप, बदाम.
कृती- प्रथम एका भांड्यात पाणी घ्या. त्यात साखर आणि वेलची पूड घालून गॅसवर गरम होण्यास ठेवा. दुसरीकडे कढई घेऊन त्यामध्ये तूप आणि बदाम घालून छान भाजून घ्या. नंतर त्यात कणिक घालून ते देखील भाजून घ्या. मगाशी वेलची पूड आणि साखर घातलेलं पाणी हळूहळू भाजलेल्या कणकेत घाला. पाणी घालत असताना एकबाजूनं मिश्रण हलवत राहा. जेणेकरून, गुठळ्या होणार नाहीत. आवडीनुसार बदामाची सजावट करून कणकेचा हलवा सर्व्ह करा.
3. केक
लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना केक आवडतो. घरच्या घरी कणकेपासून केक बनवू शकता.
साहित्य- दोन वाटी कणिक, ३-४ चमचे बटर, चिमूटभर बेकिंग पावडर, दोन वाटी साखर, चवीनुसार मीठ, वेलीची पूड, सुका मेवा, अर्धी वाटी दही.
कृती- प्रथम एका भांड्यात सगळं साहित्य घेऊन ते सगळं छान एकजीव करून घ्या. त्यात अर्धी वाटी पाणी घाला. जेणेकरून केकचं बॅटर तयार होईल. तुम्ही जर ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर १८०℃ अंश सेल्सिअसला ४० मिनिटं ठेवा. तुम्ही जर कुकर करणार असाल तर अॅल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करा. आता अॅल्युमिनियमच्या भांड्याला आतून तेल लावून घ्या आणि त्यात केकचं बॅटर ओता. कुकरमध्ये २५ मिनिटं ठेवा. टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने केक व्यवस्थित बेक झालाय की नाही ते बघू शकता. सुरीला केकचं मिश्रण चिकटलं नाही तर केक झालाय असं समजावं

4. पंजिरी
साहित्य- दोन वाटी कणिक, एक वाटी साखर, एक वाटी तूप, मनुके, बदाम, काजू.
कृती- प्रथम एक कढई घ्या. त्यात काजू, बदाम कमी आचेवर भाजून घ्या. हे झाल्यानंतर बाजूला ठेवा. आता कढई कमी आचेवर ठेवून गव्हाचं पीठ भाजून घ्या. पिठाला तांबूस रंग येत नाही तोपर्यंत भाजत राहा. गॅस बंद करून त्यात पिठी साखर आणि भाजून घेतलेला सुका मेवा घालून मिश्रण परतवून घ्या. थंड झाल्यावर पंजिरी सर्व्ह करा.
5. बर्फी
साहित्य- अर्धी वाटी तूप, एक वाटी कणिक, चिमूटभर वेलची पूड, अर्धी वाटी गूळ.
कृती- प्रथम नॉन स्टीक कढई घ्या. त्यात तूप आणि पीठ घालून भाजून घ्या. थंड झाल्यानंतर त्यात वेलची पूड आणि गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण एका ताटात काढून सेट करा. त्यावर खोबरं आणि सुका मेवा घाला. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा. अशा प्रकारे कणकेची बर्फी तयार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.