आदर्श शिक्षकांच्या उपक्रमांसाठी आकाश करा मोकळे- योगेश कुंभेजकर
‘गुरुजीं’च्या आदर्श प्रयोगाला राजमान्यता देणारा अभिनव उपक्रम
नागपूर, दि. 3 : प्रत्येक शाळेत एखादा आदर्श शिक्षक असतो. एखादा शिक्षक वेगळेपणाने काम करतो. अशा उपक्रमशील शिक्षकाच्या कलागुणांना अन्य शाळांमध्ये देखील उपयोगात आणावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुजींचे आदर्श प्रयोग जिल्हाभर अंमलात आणण्यासाठी सादरीकरण महोत्सव जिल्ह्यात सुरू केला आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर या संस्थेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने एक अभिनव प्रयोग जिल्ह्यात सुरू झाला आहे. उपक्रमशील असणाऱ्या शिक्षकांचे सादरीकरण जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व इतर सर्व शिक्षकांसमोर करण्यासाठी 3 जानेवारी ते 11 जानेवारी या काळात सादरीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा यामध्ये समावेश असून 13 तालुक्यांचे चार गटांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 3 जानेवारी रोजी मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वानाडोंगरी येथे केले.
यावेळी पंचायत समिती हिंगणाच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री जोशी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूरच्या प्राचार्य हर्षलता बुराडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी वर्ग विषय सहाय्यक उपस्थित होते. तसेच सहभागी तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमात नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी व कळमेश्वर या चार तालुक्यातील प्रत्येकी दोन शिक्षकांनी त्यांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न व त्यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने राबविलेले प्रेरणादायी व उपयुक्त अशा उपक्रमाचे सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमासंदर्भात शिक्षकांची चर्चा करून मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व शिक्षकांना कोरोनानंतरच्या काळामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने नियोजन करण्यासंदर्भात सूचना केल्या. तसेच जिल्ह्यातील इतर शिक्षकांनी देखील आपल्या उपक्रमशील प्रयोगांना इतरांसोबत वाटून घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना उपक्रमशील शिक्षकांनी केलेले प्रयोग पाहता यावे, यासाठी युट्युब लाईव्ह कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची लिंक जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व शिक्षकांना व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. सदर कार्यक्रम युट्युबवर उपलब्ध असून सर्व शिक्षकांनी अनिवार्यपणे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण बघावे व प्रेरणा घ्यावी, असे आवाहन योगेश कुंभेजकर यांनी केले. सदर कार्यक्रमांतर्गत यापुढे सादरीकरणाचे आयोजन तालुका उमरेड येथे दिनांक 5 फेब्रुवारीला, रामटेक येथे 6 फेब्रुवारीला, तर काटोल येथे 11 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 1 या वेळेत करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण युट्युब लाईव्हच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्याची लिंक शिक्षकांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर प्रसारित करण्यात येईल. तेव्हा सर्वांनी न चुकता या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर या संस्थेच्या प्राचार्य श्रीमती हर्षलता बोराडे यांनी केले आहे.