मनसुख हिरेन यांना यापायी गमवावा लागला जीव

Share This News

मुंबईः अँटिलियापुढील कारमध्ये स्फोटके ठेवल्याची जबाबदारी मनसुख हिरेन यांनी स्वीकारावी, असे पोलिस अधिकारी सचिन वाझे याला वाटत होते. मात्र, हिरेन यांनी त्यास नकार दिला. हिरेन यांच्याकडून आपला कट उघडकीस येण्याची भीतीही वाझे यांना वाटत होती. त्यातून वाझे याने मनसुख हिरेन यांची हत्या घडवून आली, अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासातून उघड झाली आहे. एटीएस ने या प्रकरणात दोघा जणांना अटक केली असून त्यात शिक्षा झालेला पोलिस शिपाई आणि एका सट्टेबाजांचा समावेश आहे.
या प्रकरणात अटक झालेल्या दोघांमध्ये निलंबित पोलिस शिपाई विनायक शिंदे आणि नरेश रमणिकलाल गोरे या सट्टेबाजाचा समावेश आहे. या दोघांनीही घटनेची कबुली दिली आहे. विनायक शिंदे याला २००७ च्या रामलखन भय्या बनावट एन्काऊंटरमध्ये शिक्षा झाली आहे. मे २०२० पासून तो पॅरोलवर बाहेर होता. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप वर्मा यांच्या टिममध्ये सचिन वाझे याच्यासह विनायक शिंदे याचाही समावेश होता. हिरेन यांच्या हत्येमध्ये आणखी काही पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता एटीएसकडून व्यक्त होत आहे. हिरेन यांची हत्या करण्याचे आदेश वाझे यानेच दिले होते. मात्र, हत्येच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित नसावा, असा एटीएसचा अंदाज आहे. वाझे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा आपसातील डिजिटल संवाद, वाझे आणि मनसुख यांच्यातील संवादातून एटीएस या संपूर्ण निष्कर्षाप्रत पोहोचली आहे.
अँटिलियापुढे स्फोटके ठेवण्याची जबाबदारी मनसुखने स्वतःच्या खांद्यावर घ्यावी, असे वाझे याला वाटत होते. मात्र, मनसुखने त्यास नकार दिला होता. याशिवाय मनसुखमुळे आपले संपूर्ण कारस्थान उघड होण्याची भीती वाझे याला वाटत होती. त्यातूनच त्याने मनसुखची हत्या करविली, असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२ मार्च रोजी क्रॉफर्ड मार्केटजवळील त्यांच्या मुख्यालयात वाझे आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतच मनसुखचा काटा काढण्याची योजना तयार झाली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करण्याचे वाझे व त्याच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न होते. मात्र, ४ मार्च रोजी रात्री ८.२० वाजता मनसुख यांना आलेला फोन आणि त्यावर करण्यात आलेली घराबाहेर पडण्याची सूचना तपास यंत्रणेच्या मनात संशय निर्माण करून गेली होती. मनसुख हिरेन यांना कारमध्ये बेदम मारहाण करून त्यांना मुब्रा खाडीत फेकून देण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.