मंत्री वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
जालना : जालना इथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी न्यायमूर्ती एम जी गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस आहे असा उल्लेख केल्याचा आरोप करीत घटनात्मक अधिकार नाकारून बोगस म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जालन्यात केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या वक्तव्याचा निषेध करीत मंत्री वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यानी वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी ओबीसी समाजाची (OBC Marcha) स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे बॅनर्स झळकावले. तसेच आगामी काळात या मुद्द्यावरुन आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्तीमुळे या महामोर्चाला परवानगी देण्यात आली होती.
हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही. हा मोर्चा आमच्या हक्कासाठी काढला आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार केले होते. तुम्ही निवेदन दिलं मी हे प्रश्न सातत्याने मांडत आहे. मी पक्ष धर्म जात पात सोडून मी फक्त ओबीसी म्हणून लढत आहे. ही प्रेरणा गोपीनाथ मुंढे यांच्याकडून मिळाली ते आज हयात नाहीत, त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलं पाहिजे, भुजबळ यांनीही धुरा हाती घेतली ते ही लढत राहिले हे ओबीसींच्या हक्कसाठी लढणारे नेते आहेत, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले होते.
ओबीसीची स्वतंत्र जनगणना होत नसेल तर मी मुख्यमंत्री आणि मोदी साहेब यांना विनंती करू. विधानसभेत स्वतंत्र जनगननेचा प्रस्ताव मी मांडणार आहे. पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर ओबीसी (OBC) समाजातील भटक्या आणि पालामध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. तरीही काही लोक आमच्यामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं होतं.