भंगाराच्या गोदामाला भीषण आग
डोंबिवली : कल्याण-शिळफाटा मार्गावरील सोनारपाडा भागात एका भंगाराच्या गोदामाला बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ हवेत पसरत
डोंबिवली : कल्याण-शिळफाटा मार्गावरील सोनारपाडा भागात एका भंगाराच्या गोदामाला बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ हवेत पसरत असतानाच भीषण स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली. याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सोनारपाडा येथील शंकरनगर परिसरात २० ते २५ भंगाराची दुकाने आहेत. बुधवारी दुपारी या भंगाराच्या दुकानांना अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच डोंबिवली एमआयडीसी, कल्याण डोंबिवली पालिकेचे अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग अधिक वेगाने पसरू लागल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी परिसरातून अग्निशमन जवानांना पाचरण करण्यात आले. तसेच परिसरातील निवासी इमारती आणि चाळींमध्ये आग पसरून जीवितहानी होऊ नये यासाठी तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
एका गोदामाच्या दुकानातील विजेची तार तुटली आणि शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ही आग लागल्याची माहिती एक स्थानिक दुकानदार देत होता. आग लागताच तेथील कामगार आग विझविण्याऐवजी पळून गेले. चौकशीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.धुराच्या लोटांमुळे किती दुकाने खाक झाली हे समजू शकले नाहीअसे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगप्रतिबंधक यंत्रणेचा अभाव
सोनारपाडा भागात जुनी शीतगृह, धुण्याची यंत्रे, फोमपासून तयार केलेल्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचा साठा करणारी भंगाराची दुकाने आहेत. या भंगार दुकानांच्या एका बाजूला शाळा आहे.अतिशय ज्वलनशील वस्तुंची ही गोदामे असताना तेथे आग प्रतिबंधक उपाययोजना भंगार मालकांनी करणे आवश्यक आहे. पण अशाप्रकारची कोणतीही तजवीज येथे केली जात नाही, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.