जातीमुळे त्रास होत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजीनामा Medical officer resigns due to caste problems

Share This News

बीड : बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जातीमुळे आपल्याला त्रास होत असल्याचे सांगत पाटोदा तालुक्यातील अमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांनी नोकरीचा राजीनामा दिला. हा राजीनामा त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. जातीमुळे एका अधिकाऱ्याला राजीनामा द्यावा लागल्याने खळबळ उडाली आहे.

अमळनेर येथे डॉ. परमेश्वर बडे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या नावाने राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल केला. ऑफिशियल व्हॉट्सअॅप ग्रुपवरही हा राजीनामा टाकला आहे. मागील दोन वर्षांपासून आपल्याला वंजारी असल्याने मानसिक त्रास दिला जात आहे. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही अशाच त्रासाला कंटाळून राजीनामा दिलेला आहे. ८ महिन्यांपासून एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर या रुग्णालयात कामकाज सुरू आहे. सततच्या त्रासाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुरोगामी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. राजीनामा देऊन २४ तास उलटले तरी अद्यापही कोणत्याच नेत्याने याची दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

काय म्हणतात वरिष्ठ?
जिल्हा आरोग्य अधिकारी आजारी असल्याने माझ्याकडे कालच पदभार आला. डॉ. बडे यांचा राजीनामा व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाहिला. अद्याप तो माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र, त्यांचा राजीनामा विहित नमुन्यात नाही. कोणत्या तारखेपासून ते राजीनामा देत आहे याचा उल्लेख नाही. त्यामुळे आरोग्य विभाग डॉ. बडे यांना पत्र पाठवणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी माध्यमांना सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.