आठवण ……. Memories

Share This News

जुन्या वाड्यात बालपण व्यतीत केलेल्या मित्रांना जुन्या काही आठवणींना उजाळा ……..

—————–

१.त्या वेळी स्वतंत्र घर ही कल्पना नव्हती. वाडा प्रकार होता. वाडे इतके मोठ्ठे असत की पुढचा दरवाजा एका गल्लीत व मागचा दरवाजा दुसऱ्या गल्लीत उघडे. 

२. घराचे दरवाजे सदैव उघडे असत्. कधी कोणी काही चोरी करेल अशी भीती मुळीच नव्हती .काही कुटुंबांची दारे समोरा समोर होती. सिव्हील इंजिनीरिंग चे कोणतेही मोजमाप खोल्यांना नव्हते म्हणजे एकमेकांना कधी काटकोनात कधी सरळ कधी अाडनीड ..असा प्रकार असे. साधी कुलुपे असत व त्याचा वापर क्वचित कधी होत असे. प्रायव्हसी नावाचा किडा तेव्हा कोणाच्या डोक्यातही नव्हता …. तरीही सर्व नियम पाळून वाडे गोकुळमय झालेले असत.

३. पदार्थांची देवाण घेवाण मुक्त पणे चालत असे. कोणत्याही कुटुंब वत्सल माऊलीला शेजारून  वाटीभर तेल, भांडे भरून पीठ अडचणीच्या वेळी, शेजारून मागायला अजिबात संकोच वाटत नसे, उलट तो एक आपला  हक्क आहे असे वाटे. उन्हाळी कामं ही सामूहिक पद्धतीनेच होत, मुलांचा कल्ला व बायकांचे पापड,कुरडया,सांडगे – वडे इत्यादी चालत असे. जून सुरू होऊन थोडा पाऊस झाला की सर्व घरांमधून लोणच्याचा वास दरवळत असे, आणि उन्हाळा संपत आला की गरम मसाल्याचा वास व कुटण्याचे आवाज सर्वत्र घुमत व त्यातच ढगांचा आवाज होऊन वळवा सारखा मुसळधार पाऊस कोसळत असे व मग जो मातीचा वास सुटे तो आजतागायत मला कोणत्याही स्प्रे, सेंट  यांनी दिलेला नाहीये. मग शाळा सुरू होण्याची घाई …गणवेश,पुस्तके, वह्या खरेदी …वा ! मग त्याला कव्हर घालणे हा एक सामुदायिक टास्क आनंदाने होत असे! घरात जी कनिष्ठ भावंडे असत त्यांची गोची होई, त्या बिचाऱ्याना कायम मोठ्यांची जुनी पुस्तके व कधी कधी गणवेश व दफ्तर …जणू त्यांचा गुन्हा होता ..ते नंतर जन्मले …सर्व मुलांच्या डब्ब्यात सारखाच बेत असे ..लोणचे, गुळंबा, मोरंबा, साखरांबा …भाजीत भेंडी,मेथी वगैरे ….इतर कुठलेही फॅड नव्हते.

४. कपडे ….या बाबतीत बहुदा एकच अलिखित नियम होता …वर्षाकाठी दोन ड्रेस, …. एक दांडीवर व दुसरा अंगावर  …बस …नो नाटक, नो ड्रामा …दिवाळीत नवीन कपडे किंवा वाढदिवसाला …कापड आणून शिवणे …. असेल तर …गल्लीतल्या त्या टेलर कडे जितक्या चक्कर मारल्या असतील तितक्या सासुरवाडीला पण मारल्या नसतील …शिवाय वाढत्या अंगाचे कपडे घेणे हा एक  अविभाज्य घटक व नियम होता त्यामुळे मापाचे कपडे अगदी नशिबानेच मिळत …जर टेलर माप चुकला तरच … 

५. Parents meeting in school हा प्रकार  त्या काळी?…. अबब ..ब.. 😩र्ण गल्लीतील व वाड्यातील शिवाय ओळखीची ज्येष्ठ मंडळी हे सर्व जण, बाय डिफॉल्ट , प्रत्येक मुलाचे पालक असत त्यामुळे खरे पालक अगदी निश्चिंत रहात …वडिलांनी एकदा का नाव शाळेत घातले की परत चुकूनही ते कधी त्या शाळेत काही कारण असल्या शिवाय जात नसत. शाळेवर व मास्तरांवर इतका भरोसा असे की स्वतःच्या बायकोवर पण नसेल ….मास्तरांना सुद्धा फ्री  हॅंन्ड होता. कीतीही , कसेही तुडवा …आमच्या दिवट्याला ….आम्ही विचारायला चुकूनही येणार नाही हो ….अर्थात ते गुरुजन ही त्याच प्रकारचे उच्च होते. 

कधी कधी रस्त्यात वडिलांचा हात पकडून एखादा मुलगा जात असेल व एखादे काका रस्त्यात भेटले व त्यांनी जर विचारले की ….काय छोकरा वाटते? कितवित आहे आता? …की त्या वडील नावाच्या इसमाची चमत्कारिक अवस्था होत असे …हळूच खाली मुलाकडे बघून ते सांगत …हा ना …आता ६ वी त ….मग मुलगा डाफरून चूक सुधारित असे ….अहो दादा, अप्पा,अण्णा,बाबा …. मी आता ७ वी त आहे …मागच्या वर्षी ६ वी त होतो …असो! सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या काळात आपले च पालक आपल्या बाबतीत विनाकारणच खूप sensative नव्हते व त्यांची आपल्यासाठी निरर्थक काळजी करण्यात energy वाया नाही गेली.

 हल्ली पालकांचे निम्मे आयुष्य ..पोरांचे करिअर या गोष्टीत च खर्च होते. 

शिकवणी लावणारा ढ या प्रकारात मोडत असे व गाईड वापरणारा कानफटात खात असे ….११ वी म्हणजे शालांत परीक्षेत कलास मिळवणे हे ध्येय असायचे व सर्वांना कौतुक! ताप मोजल्या प्रमाणे ९७,९८,९९.५, १००,१०१,१०२ अशी मार्कांची खिरापत अजिबात नव्हती …संस्कृत ला जगन्नाथ शंकरशेठ मिळणे ….नोबेल मिळण्या इतके दुर्लभ होते …असो!

६. त्या काळी खाऊ हा प्रकारच वेगळा होता …. ग्लुकोज बिस्कीट, रावळगांव चॉकलेट, साखरेच्या गोळ्या,लिमलेट, लोलिपोप, तोंड लाल होणारे चॉकलेट तसेच बोरं,चिंच,पेरू, करवंद, जांभूळ …हा सर्व खाऊ प्रकारात मोडत असे. मिल्क ब्रेड व खारी ही पण खाऊ प्रकारात. उन्हाळ्यात आंबेच आंबे …खेळताना खिशात छोटे छोटे आंबे भरून चोखणे ते वेगळे, रसाचे वेगळे, कापून खाण्याचे वेगळे …. असं असे …आज डझन व किलो मध्ये मिळतात. शेकड्याने मिळण्याचे दिवस इतिहास जमा झालेत. 

ऊस आम्ही खेळताना खायचो …तोंडाने सोलून …असे मुलाला लहानपणी सांगितले तर तो म्हणाला …बाबा तुम्ही ‘ स्टोन एज मॅन ‘ होता का? … देवा! …

७. साबणा मध्ये लाईफ बॉय आघाडीवर होता.दगड सारखा टणक व खूप दिवस जात असे शिवाय थेटर मध्ये त्याची जाहिरात जोरात चालायची ….

 ” आरोग्याचे रक्षण करीत असे लाईफ बॉय …..ज्याचे घरी आरोग्य …तेथे वास करी” …सुरेश ओबेरॉय ही जाहिरात करे.

लक्स, जय, हमाम ही खास सुगंधा साठी. सुवासिक तेल एकदाच असे …दिवाळीत …बहुदा लाल रंगाचे असे ते.

निरमा खूप नंतर अवतरले.त्या आधी साबण चुरा व वडी याच वापरात असत व टिनोपोल व निळ. पांढऱ्या कपड्यांना निळ देणे अनिवार्य होते. जणू काही दिले नाही तर शिक्षा झाली असती.

८. त्या वेळी मच्छरदाणी कधी लागतच नव्हती. डास हा प्रकार खूप नंतर कळला. 

त्या वेळी आजार पण मर्यादित असे. सर्व २,४ गल्लीला एक डॉक्टर पुरत असे. बाटलीतील लाल औषध, खुणेकरता  झिग झॅग आकारात उभा लावलेला कागद, पुड्या मधील गोळ्या अथवा भुकटी.

इंजेक्शन घेणे म्हणजे मोठाच आजार … रक्त, लघवी अथवा एक्स रे काढणे म्हणजे खरेच काहीतरी सीरियस मॅटर!

कोणी कागदी पिशवीत संत्री मोसंबी घेऊन जात असेल तर लगेच विचारणा होई …. काहो ..कोण आजारी आहे? …

आजकाल उठल्या सुठल्या सर्व तपासणी केल्या तरी डॉक्टर छातीठोक पणे काय झाले ते निदान करू शकत नाही.

९. गप्पा, खेळ, सिनेमा, सर्कस व रेडिओ हेच करमणूक साधन.

त्यात बुधवार बिनाका म्हणजे अगदी पर्वणीच. अमीन सयानी चा आवाज …आज का सरताज गीत ….सर्व जण त्या रेडिओ भोवती व …..नेमके त्याच वेळी तो खोका काशी करायचा …..किर्र..र….आवाज …… मग परत tuning, antenna बघणं ….आनंदावर विरजण!

आधी valve चे गरम होणारे रेडिओ, नंतर transistor आले, मग पॉकेट रेडिओ …

असो! अशा अनेक गमती जमती!

आज परत जागवल्या गेल्या …

खूप काही आहे …आठवणींच्या खजिन्यात …परत कधीतरी ……

पुन्हा भेटुत..


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.