मेट्रो कारशेड : समितीचा अहवाल वाचा, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

Share This News

आदित्य ठाकरे हे युवा नेते आहेत. ते पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करताहेत. त्यांच्याच सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल त्यांनी किमान वाचावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
मुंबई मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमार्गमध्ये उभारण्यासाठी १0२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी १ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारविरोधात टीकास्त्र डागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे तर, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एक सल्लाही दिला आहे.
आदित्य ठाकरे नवीन आहेत त्यांनी जनहितासाठी काम करावे. त्यांच्या सरकारने सौनिक समिती स्थापन केली होती. या चार सदस्यांच्या समितीने अहवाल दिला आहे त्याचा आदित्य यांनी अभ्यास करावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्य सरकारने आरेमध्ये बांधकाम सुरू करावे आम्ही कोणतीही टीका-टिपण्णी करणार. याउलट सरकारच्याच पाठिशी खंबीरपणे उभे राहू. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करु नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलंच पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय, कारशेडचे काम त्वरित सुरू न केल्यास २0२४ पर्यंत लांबला जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्र्यांनी कार शेडच्या कामात मिठाचा खडा टाकू नये असं काल म्हटले होते. पण ते स्वत:च त्यांच्या निर्णयामुळे मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी या प्रकल्पाची किंमत वाढणार आहे. उशीर झाला तर दिवसाला सर्व मिळून पाच कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.