नव वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रोत रेकॉर्ड रायडरशीप
नागपूर
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोमध्ये मोठी गर्दी दिसून आली. मेट्रोच्या सुविधेचा लाभ घेत १५,४११ प्रवाशांनी मेट्रोच्या अँक्वालाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. काल शुक्रवार १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवासी सेवेमध्ये आजवरचा सर्वात मोठा उच्चांक आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी रोजी छत्रपती मेट्रो स्टेशन येथील प्रस्तावित बांधाकामाकरिता ऑरेंज मार्गिकेवरील (रिच – १) सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी सेवा बंद होती. एक लाईन बंद असतानादेखील नागरिकांचा मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळाला.
मेट्रोच्या प्रवासी संख्येत गेले काही दिवसात सातत्याने वाढ होत आहे. मागच्या रविवारीदेखील मेट्रोच्या सर्व लाईन मिळून २२,१२३ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला होता. एवढेच नव्हे तर सुटीचा दिवस वगळता इतर दिवसालादेखील मेट्रोची सरासरी रायडरशिप १0 हजारांच्या वर आहे. शहरात २५ कि.मी. अंतराचे मेट्रोचे जाळे नागरिकांकरिता उपलब्ध असून या मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी मेट्रो सुरू आहे. सकाळी ८ ते रात्री ८ पयर्ंत सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी व सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान नियमित मेट्रो सेवेचा लाभ घेता येत आहे. महामेट्रोतर्फे प्रवाशांसाठी विविध सोई सुविधा, मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवासासोबत आता आपली स्वत:ची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध करण्यात येत आहे. मेट्रो ट्रेनमध्ये सायकल घेऊन जाण्यास मेट्रोने सुरुवात केली आहे.
मेट्रोने नागरिकांनी प्रवास करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त महा मेट्रोतर्फे नागरिकांसाठी सेलिब्रेशन ऑन व्हिल्स अनोखी योजना आखण्यात आली असून फक्त ३000 रुपयांमध्ये संपूर्ण ३ कोचच्या मेट्रो ट्रेनमध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरे करू शकतात. प्रवासासोबत आता आपली स्वत:ची किंवा फिडर सर्विस उपलब्ध करण्यात आली आहे. महा मेट्रोच्यावतीने नव वर्षाच्या निमित्त्याने न्यू ईयर कार्निवलचे आयोजन मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आहे. येथे विविध प्रकारचे १७ स्टॉल्स उपलब्ध आहे.