‘भारत बंद’ला शहरात संमिश्र प्रतिसाद
विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा सहभाग
नागपूर : तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर नागपुरातील ऑटोमोटीव्ह चौकात शीख समुदायांनी निदर्शन केली. यात विविध राजकीय पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या.
शहरात विशेषत: उत्तर नागपुरातील अनेक दुकाने बंद होती. या भागातील रस्त्यावरील वर्दळ देखील मंदावली होती. सकाळी दहा वाजतापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत कामठी मार्गावरील ऑटोमॉटीव्ह चौकात आयोजित धरणे, निदर्शन आंदोलनात विविध धर्मीय, पक्ष, संघटनांच्या नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मोदी सरकारच्या विरोध घोषणा देऊन तीनही कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
आम आदमी पक्षातर्फे सकाळी ११ वाजता सीताबर्डी येथे व्यावसायिकांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता आवाहन करण्यात आले. या आवाहनाला काही दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दुकाने बंद केली. या आंदोलनाचे नेतृत्व देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंघ, नागपुर संयोजक कविता सिंघल यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर प्रदेशच्या वतीने अध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समता सैनिक दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वात हिंगण्यात बंद पाळण्यात आला तर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात सक्करदरा चौकात निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिंगणा रायपूर येथे रॅली काढून बंदचे आवाहन केले
शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी कष्टकरी जन आंदोलनाचे विलास भोंगाडे, रोशनी गंभीर, वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात धरणे देण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सेंट्रल अॅव्हेन्यूवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करण्यात आली. चितार ओळी, गांधी पुतळा ते शहीद चौक पैदल मार्च काढण्यात आला. यामध्ये अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब शब्बीर अहमद विद्रोही व महापालिकेतील गट नेता नगरसेवक दुनेश्वर पेठे सहभागी झाले.
उत्तर नागपुरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक राजा करवाडे, रत्नाकर जयपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कमाल चौक ते इंदोरा चौक पदयात्रा काढण्यात आली. यात कुणाल राऊत सहभागी झाले होते.
कळमना धान्य बाजारात कडकडीत बंद
भारत बंदला कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्यगंज आडतिया मंडळाने शंभर टक्के समर्थन देत सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवली. त्यामुळे बाजारात कोणताच व्यवहार झाला नाही. एरवी गजबजलेल्या बाजारात दिवसभर शुकशुकाट होता. मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी न होता बाजारपेठा सुरू ठेवल्या. अध्यक्ष अतुल सेनाड यांच्या नेतृत्वात सर्व आडतिया मंडळाच्या सदस्यांनी काळया फिती लावून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. बंदमध्ये कळमना मार्केटमधील ६५० आडतिया- व्यापारी सहभागी झाले. त्यानंतर ‘काला कानून वापस लो’ चे नारे देत येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. आंदोलनात पदाधिकारी गोपाळ कळमकर,सचिव रामेश्वर हिरुडकर, सारंग वानखेडे, नरेश जिभकाटे आदी सहभागी झाले. सकाळी कळमना बाजारात केवळ भाजी बाजार सुरू होता. मात्र दुपारनंतर तोही बंद करण्यात आला.
निम्म्या ऑटोरिक्षा बंद; वीज कर्मचाऱ्यांचीही निदर्शने
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत नागपुरातील टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ऑटोरिक्षा बंद ठेवले. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वात वीज कर्मचाऱ्यांनी विविध वीज कार्यालयापुढे निदर्शने केली. ऑटोरिक्षा बंद असल्याने सीताबर्डी, रविनगर, गांधीबागसह इतर काही परिसरात नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी ऑटोरिक्षातून प्रवासी वाहतूक थांबवली. वीज कर्मचाऱ्यांनीही निदर्शने करीत वीज कंपनीपुढे द्वारसभा घेतल्या.
मध्य नागपुरात काँग्रेसचे ‘चड्डी’ घालून आंदोलन
काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील सहा मतदार संघात दुचाकी रॅली काढली. तसेच चौकातील दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. दक्षिण नागपूर मध्ये गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला. मध्य नागपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘चड्डी’ घालून आंदोलन केले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष मोतीराम मोहाडीकर उपस्थित होते. दक्षिण-पश्चिम नागपूर मध्ये ब्लॉक अध्यक्ष पंकज थोरात यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला. पश्चिम नागपूर मध्ये ब्लॉक अध्यक्ष राजकुमार कमनानी यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला. पूर्व नागपूर मध्ये ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईचे अध्यक्ष हुकूमचंद आमधरे आणि काँग्रेस नेते सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कामठी येथे आंदोलन करण्यात आले.
संघर्ष समितीचा बंद यशस्वी झाल्याचा दावा
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या भारत बंदला नागपुरात उत्तम प्रतिसाद मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समिती, कॉटन मार्केट येथे धान्य, भाजपल्याच्या गाडय़ा आल्या नाही. त्यामुळे संपूर्ण बाजार बंद होता. सीताबर्डी ८० टक्के बंद होते. व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर भाकप, किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या, असे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक अरुण वनकर यांनी सांगितले.
बंदचा फटका; ५० बसेस रद्द
भारत बंदमुळे एसटीच्या नागपूर विभागातील बसेसच्या ५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. नागपुरहून अकोला, बुलढाणा, परतवाडाकडे एसटीने निघालेले प्रवासी अमरावतीहून पुढे बसेस नेण्याची परवानगी न मिळाल्याने अमरावतीत अडकून पडले. नागपूरहून राज्याच्या विविध भागात रोज सुमारे ३५० बसेस १ लाख २५ हजार किलोमीटर धावतात. परंतु शेतकरी भारत बंदमुळे फार कमी नागरिक प्रवासासाठी बाहेर पडले. प्रवासी कमी मिळण्यासह सुमारे ५० बसेस रद्द झाल्यामुळे नागपूर विभागात एसटीचे सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. या वृत्ताला एसटीचे नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दुजोरा दिला.