गडचिराेली ; मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन शेतकऱ्याना न्याय देण्याचे साकडे घातले
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याचे साकडे घातले. आधारभूत केंद्रांवर धान खरेदीची मर्यादा केवळ ९.६० क्विंटल इतकी शासनाने केली आहे. गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन हाेत असल्याने धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करावी, अतिक्रमित व वनहक्कधारक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, या शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळाचे सर्व याेजनांचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. अत्यंत किचकट असणाऱ्या ऑनलाईन खरेदी प्रक्रियेमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययाेजना करावी, अशी मागणी आ. डाॅ. हाेळी यांनी ना.भुजबळ यांच्याकडे केली आहे.