समान काम समान वेतनासह कोरोना महामारीतील दैनिक भत्ता मिळावा – प्रकाश भोईर
डोंबिवली, ६ नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एनयुएचएम आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला शासनाच्या समान काम समान वेतन अंतर्गत वेतन व भत्ते मिळत नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे मनसे प्रकाश भोईर यांनी सांगितले आणि याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार करून वेतन व भत्ते मिळण्यासाठी मागणी करत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पालिकेकडे केली आहे.
नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सांगितले की जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोना कोविड – १९ सारख्या भयंकर महामारीच्या साथरोग काळातही हे कर्मचारी आपली सेवा व कर्तव्य इमाने इतबारे बजावत होते. मात्र त्यांना त्यांच्या कामाचा भत्ता मिळाला नसल्याचे समजते.दिवसेंदिवस होणारी वाढती महागाई व कोरोना काळातील लॉक डाऊनच्या कालावधीतील अर्थकारणाची झालेली कोंडी, त्यामुळे आपल्या कुटूंबाचा इतक्या अल्प वेतनात उदरनिर्वाह करणे या कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे.ही बाब लक्षात घेऊन एनयुएचएम आरोग्य कर्मचारी यांना महापालिकेने निदान शासन आदेशाप्रमाणे समान काम समान वेतनाची अदायगी करणेबाबत विचार होणे आवश्यक आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी कोरोना कोविड १९ या साथरोगाच्या संकटकाळात महापालिकेचे काम केले असल्यास त्याची सविस्तर माहिती घेऊन काम केलेल्या कर्मचारी वर्गास कोविड भत्त्याची अदायगी करणेबाबत विचार करावा व या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.