विद्यार्थ्यांच्या संतापानंतर २१ मार्चला होणार एमपीएससी MPSC will be held on March 21 after the anger of the students

Share This News

नागपूर : कोरोनाचे कारण पुढे करीत पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्चला होणार आहे. शुक्रवार, १२ मार्चला आयोगाने यासंदर्भात नवीन तारीख जाहीर केली आहे.


मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांना अंधारात ठेवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मदतीने आयोगाला परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना केली होती. याबाबत कोणतीही पूर्व कल्पना नसल्याने महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना व काँग्रेस या पक्षांमध्ये दुफळी निर्माण झाली. राज्यभरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. काँग्रेसनेही परीक्षा पुढे ढकलू नये म्हणून भूमिका घेतली. मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या विभागाने एमपीएससीला पाठविलेला पत्राबाबत अंधारात ठेवल्याची जाहीर कबुली द्यावी लागली. विरोधी पक्ष भाजपने मंत्र्यांमधील समन्वयाच्या या अभावावरून सरकारला चांगलेच घेरले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने फेसबुक लाइव्ह करीत विद्यार्थ्यांना संबोधित करावे लागले.


२४ तासांत परीक्षेची नवी तारीख जाहीर होईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवार, ११ मार्चला सायंकाळी ८.३० वाजता जाहीर केले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी एमपीएससीने नवे प्रसिद्धीपत्रक काढत राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्चला होईल असे जाहीर केले. याशिवाय महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आता ११ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि कोरोनाच्या मुद्द्यावरून करण्यात येत असलेले लॉकडाउन यामुळे राज्यातील व्यापारी, कष्टकरी, श्रमिक नाराज असतानाच एमपीएससीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचा संताप सरकारने ओढवून घेतला आहे. त्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा हाती मिळाला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.