मुनगंटीवार म्हणतात, राज्य सरकार कुंभकर्णी झोपेत

Share This News

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत संपली आहे. त्यानंतरही जर राज्य सरकार या मंडळांवर नियुक्त्या करीत नसेल तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णालाही लाजवेल अशा झोपेत आहे असेच म्हणावे लागेल, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. संजय कुटे, भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आदी उपस्थित होते.


वैधानिक विकास मंडळांवरील नियुक्त्यांच्या मुद्द्यावरून बुधवारी भाजपच्या विदर्भ-मराठवाड्यातील आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकार नियुक्त्या करीत नसल्याने आता राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावे, अशी मागणी यावेळी मुनगंटीवार यांनी केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी विदर्भ-मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पक्षीय राजकारण सोडून विदर्भ-मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी एकत्र या, असे ते म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री म्हणून आपण अनेक प्रकल्प विदर्भात आणले. त्यासाठी मुबलक निधी दिला. परंतु आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार षडयंत्र करीत पुन्हा विदर्भावर अन्याय करीत आहे. मानव विकास निर्देशांकानुसार राज्यातील १२५ तालुके मागास आहेत. त्यातील ९० तालुके विदर्भातील आहेत. त्यानंतरही जर सरकार विदर्भाकडे दुर्लक्ष करीत असेल, तर त्यांना धडा शिकविलाच पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले. राज्य सरकार असाच प्रकार करणार असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू द्यायचा की नाही, अशी भूमिका घ्यावी लागेल असे मुनगंटीवार म्हणाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.