मुनगंटीवारांची ‘गुगली’, शिंदेंना म्हणाले तुम्ही सीएम मटेरियल Mungantiwar’s ‘googly’, Shinde said you are the CM material

Share This News

मुंबई : विधान सभेतील चर्चेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टाकलेल्या ‘गुगली’मुळे शिवेसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांची चांगलीच गोची झाली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. विदर्भ आणि मराठवाड्यावर होत असलेल्या अन्यायाला त्यांची वाचा फोडली. वैधानिक विकास मंडळांवरील नियुक्त्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात उत्तर द्यावे लागले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार, २ मार्चला मुनगंटीवार पुन्हा विदर्भ, मराठवाड्यावरील अन्यायाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेत.
यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहारात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचविण्यात येत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. १५ महिने उलटून या अधिकाऱ्याची साधी चौकशी झालेली नाही. निलंबनाची कारवाईही झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सरकारच्यावतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना ‘तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची (सीएम मटेरियल) क्षमता आहे. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका’, असे म्हटले. मुनगंटीवार यांनी हा गुगली टाकताच शिंदे यांच्या चेहऱ्यावर थोडे हसू फुलले मात्र शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांच्या चेहऱ्यांवरील रंग मात्र उडाला.


अधिवेशनातच काय तर त्यापूर्वीही सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. विदर्भातील जनतेच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सभागृहाव्यतिरिक्त संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विधिमंडळ वर्तुळात सध्या विदर्भातील भाजपच्या नेत्यांपैकी मुनगंटीवार सर्वाधिक सक्रिय व आक्रमक दिसत असल्याचे सरकारमधील मंत्रीही बोलत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.